पो डा. प्रतिनिधी, चंद्रपूर, : दुध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी 28 जून 2023 च्या शासन निर्णयानुसार जिल्हानिहाय संयुक्त पथकामार्फत आदेश निर्गमित झाले आहेत. राज्यातील व जिल्ह्यातील जनतेला स्वच्छ व गुणवत्तापूर्ण दुधाचा पुरवठा होण्याच्या अनुषंगाने, दूध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी जिल्ह्यात जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. दूध भेसळीच्या प्रकारावर कारवाई करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून या समितीत अपर पोलीस अधीक्षक, सहाय्यक आयुक्त(अन्न) अन्न व औषध प्रशासन, जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त, उपनियंत्रक वैद्यमापन शास्त्र व जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांचा समावेश आहे.
या पथकामार्फत 6 सप्टेंबर रोजी अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. मंगेश काळे, जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी डॉ. वर्षा बागडे, अन्न व सुरक्षा अधिकारी श्री. सातकर, वैद्यमापन शास्त्राचे उपनियंत्रक जितेंद्र मोरे, तसेच प्रभारी विस्तार अधिकारी राजेंद्र तुम्मेवार व इतर शासकीय अधिकाऱ्यांनी गोपाल डेअरी, भाग्यश्री घी भंडार, माधव डेअरी व कृष्णा डेअरी हवेली कॉम्प्लेक्स येते धाड टाकून तपासणी केली. या तपासणीमध्ये दूध, पनीर, खवा व दही यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. चंद्रपूर व जिल्ह्यातील दूध व दुग्धजन्य पदार्थात कोणत्याही प्रकारे भेसळ होणार नाही यासाठी सदर जिल्हास्तरीय समिती अंतर्गत यापुढेही धडक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी डॉ. वर्षा बागडे यांनी कळविले आहे.