शासन आपल्या दारी उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन
वाशिम, दि. 21 : कारंजा येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अल्पसंख्यांक लोकसंचालित साधन केंद्राची 6 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 20 जून रोजी महेश भवन येथे संपन्न झाली. सभेला जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपूरे, सहायक जिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख, लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा छाया मोटघरे, उपाध्यक्ष प्रज्ञा मेश्राम, जमिलाबी नसीम, कार्यक्रम अधिकारी प्रांजली वसाके, व्यवस्थापक विजय वाहणे व श्री. खोडवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. खडसे म्हणाले, ‘ शासन आपल्या दारी ’ हा शासनाचा महत्वाचा उपक्रम राज्यात सुरु आहे. शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजना आहेत. त्या योजनांची माहिती लाभार्थ्यांना नसल्यामुळे अनेक लाभार्थी हे योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. कोणताही पात्र लाभार्थी हा योजनेच्या लाभापासून वंचित राहून नये यासाठी नागरीकांनी ‘ शासन आपल्या दारी ’ या उपक्रमात सहभागी होवून त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती जाणून घ्यावी. संबंधित नगर पालिकेमध्ये जावून नागरीकांनी विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी अर्ज भरुन दयावे. त्यामुळे योजनांचा या अभियानादरम्यान लवकर लाभ मिळण्यास मदत होईल. अल्पसंख्यांक समाजातील लाभार्थ्यांसाठी शासनाच्या विविध योजना आहे. लोकसंचालित साधन केंद्रामार्फत समाजातील नागरीकांना जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेली ‘ विकासाची दिशा ’ ही अल्पसंख्यांक समाजासाठी असलेल्या योजनांची माहिती पुस्तिका दिली आहे. त्या पुस्तकातून योजनांची माहिती घेवून विविध योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
श्री. नागपूरे म्हणाले, अल्पसंख्यांक लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून कारंजा शहरातील अल्पसंख्यांक समाजातील बचतगटात असलेल्या महिलांचे जीवनमान उंचावले पाहिजे यासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यांना उद्योग व्यवसाय सुरु करता यावा, यासाठी देखील कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. बचतगटाच्या माध्यमातून कारंजा शहरातील अल्पसंख्यांक महिलांच्या विकासाला गती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमती मोटघरे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. सन 2022-23 या वर्षात अल्पसंख्यांक लोकसंचालित साधन केंद्राने केलेल्या प्रगतीची माहिती दिली. साधन केंद्राचे आजपर्यंतचे उत्पन्न 52 लक्ष 3 हजार 100 रुपये असून कारंजा शहरात अल्पसंख्यांक समाजातील महिलांचे 352 बचतगट आहे. यामध्ये 3991 महिला बचतगटांच्या सदस्य आहेत. तसेच त्यांचे विविध उद्योग व्यवसाय सुरु आहे. त्यामुळे कुटूंबाला बचतगटातील महिलांनी सुरु केलेल्या व्यवसायाचा आधार झाला आहे. अल्पसंख्यांक महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम कारंजात राबविण्यात येत असल्याची माहिती श्रीमती मोटघरे यांनी दिली.
आर्थिक आढावा श्रीमती मेश्राम यांनी सादर केला. यावेळी श्री. देशमुख यांनी देखील उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते अल्पसंख्यांक लोकसंचालित साधन केंद्राच्या सन 2022-23 च्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाला अल्पसंख्यांक बचतगटातील 500 पेक्षा जास्त महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन अल्पसंख्यांक लोकसंचालित साधन केंद्राचे व्यवस्थापक विजय वाहणे यांनी केले. आभार अध्यक्षा श्रीमती मोटघरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकसंचालित साधन केंद्राचे सर्व कार्यकारणी सदस्य, लेखापाल व सहयोगीनी यांनी परिश्रम घेतले.