अमळनेर नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनांना निधी उपलब्ध करून देण्यात येईल: मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही
पोलीस डायरी प्रतिनिधी, जळगाव – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार असून यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ, महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. या योजनेमुळे राज्यातील विकास कामांना खीळ न बसू देता ते अविरतपणे सुरु ठेवण्यात येतील, असे मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांसाठी शंभर कोटी रूपये देण्यात येतील. त्याचबरोबर एमआयडीसीत युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नवीन उद्योग आणण्यात येतील. अमळनेर नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनांना निधी उपलब्ध करून देण्यात येईल. अशी ग्वाही ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कवयित्री बहिणाबाई यांच्या कवितेचा संदर्भ दिला. आम्ही राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना आणली आहे. रक्षाबंधनाच्या आधी म्हणजे पुढच्या आठवड्यात १७ ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट असे दोन्हीही हप्ते पडतील आणि नंतर प्रत्येक महिन्यात दीड हजार रुपयांचा हप्ता मिळत राहील. या महिन्यात ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना एकाचवेळी तीन महिन्यांचे पैसे मिळणार आहेत. योजना सुरु होऊन एक महिनाही झालेला नाही तरी राज्यात १ कोटी ४० लाख महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे.
प्रशासनाच्या मेहनतीमुळे हे शक्य झाले आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू करण्यासाठी शासनस्तरावर दहा महिन्यांपासून काम सुरू होते. या योजनेसाठी ३३ हजार कोटी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, ही योजना यापुढेही कायम सुरूच राहणार आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी महिला भगिनींना आश्वस्त केले.
राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून ३ गॅस सिलिंडर मोफत देण्यात येत आहेत. तरूणांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. यात तरूणांना महिन्याला १० हजार मानधन देण्यात येत आहे. गेल्या वर्षी शासनाने ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’ सुरु केले. केवळ वर्षभरात २ कोटींपेक्षा जास्त माता भगिनींना याचा फायदा झाला. ‘लेक लाडकी’ योजनेतून मुलींना वयाच्या १८ वर्षानंतर एक लाख रूपये मिळणार आहेत, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, तीर्थ दर्शन, युवा कार्य प्रशिक्षण, बळीराजा वीज सवलत, वयोश्री योजना तसेच मुलींना उच्च शिक्षणासाठी शंभर टक्के शुल्क माफीचा निर्णय अशा योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनेमुळे शेतकरी, कष्टकरी, महिला व युवकांच्या जीवनात आमुलाग्र बदल होणार असून यातील एकही योजना बंद होणार नाही यांची ग्वाही ही मुख्यमंत्री यांनी यावेळी दिली.