रिसोड येथे माविमची 13 वी वार्षिक सभा उत्साहात
पो. डा. वाशिम : माविमने महिलांचे केवळ बचतगटच तयार केले नाही तर त्यांनी महिलांना उद्योग व्यवसायाची दिशा दाखविली.त्यामुळे महिलांच्या विकासात महिला आर्थिक विकास महामंडळाची भूमिका महत्वाची आहे.असे प्रतिपादन आमदार अमित झनक यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या रिसोड लोकसंचालित साधन केंद्रांतर्गत कार्यरत ग्रामीण भागातील बचतगटांची 13 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 22 जून रोजी जी.बी.लॉंन येथे संपन्न झाली.
अध्यक्षस्थानी लोकसंचालीत साधन केंद्राच्या अध्यक्ष नंदा गिर्रे होत्या. विशेष अतिथी म्हणून आमदार अमित झनक होते.तर जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,पंचायत समिती सदस्य गजानन आरु,बँक ऑफ महाराष्ट्र अकोला झोनचे व्यवस्थापक भगवान सुरोसे,माविमचे सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख आयसीआयसीआय बँकेचे प्रदीप सांबारे व श्री.गुल्हाने, मालेगाव सीएमआरसीचे व्यवस्थापक शरद कांबळे,संतोष मुखामाले,प्रमोद गोरे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती .
आमदार.श्री.झनक पुढे म्हणाले, कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे काम महिला आज बचतगटांच्या माध्यमातून करीत आहे.स्त्री आणि पुरुष ही संसार रथाची दोन चाके आहेत.दोन्ही चाके आता आर्थिकदृष्ट्या गतिमान होताना दिसत आहे.ते केवळ महिलांच्या बचतगटामुळेच शक्य झाले आहे. ग्रामीण विकासात बचतगटांतील महिलांचे योगदान महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.खडसे यांनी उपस्थित महिलांना शासन आपल्या दारी या उपक्रमाची माहिती दिली व गावपातळीवर बचतगटांच्या महिलांनी या उपक्रमात सहभागी होऊन विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्टीने साक्षर करण्याचे काम माविमने केले आहे.पूर्वी केवळ चूल आणि मूल या मर्यादेत असलेली महिला आज विविध क्षेत्रात आपली कर्तबगारी सिद्ध करतांना दिसत आहे. मिळालेल्या संधीचे सोने करण्याचे काम महिला करताना दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. सुरुशे यांनी बँक ऑफ महाराष्ट्र बचतगटासाठी सर्व सेवा देण्यासठी तत्पर असल्याचे सांगितले.यावेळी श्री. आरु व अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावत्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रेरणा गीताने सुरूवात करण्यात आली.रिसोड
सीएमआरसीचे व्यवस्थापक प्रदीप तायडे यांनी सन 2022-23 या आर्थिक वर्षाचा लेखाजोखा सादर केला.
या सभेत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रिसोडच्या वतीने 20 गटाला 51 लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले.आयसीआयसीआय बँकेच्या वतीने 3 गटाला प्रत्येकी 9 लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले.
सभेचे औचित्य साधून समाजात स्त्रियांना सन्मानाची वागणूक देणारे व महिलांना माणूस म्हणून अधिकार जपणारे 24 गावातील पुरुषांचा सुधारक म्हणून तसेच बचतगटातील काही महिलांच्या मुलींनी यावर्षी 10 वी आणि 12 वीमध्ये गुणवंत श्रेणीमध्ये यश संपादन केल्याबद्दल सन्मानचिन्ह देवून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला रिसोड तालुक्यातील 36 गावातील 1290 महिलांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन प्रमोद गोरे यांनी केले. प्रास्ताविक व आभार व्यवस्थापक प्रदीप तायडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोक संचालित साधन केद्र,रिसोडचे कार्यकारी मंडळ,सीआरपी,सर्व सहयोगिनी व लेखापाल यांनी परिश्रम घेतले.