लोकसभा क्षेत्राची सर्वांगीण प्रगती करेन – ना. सुधीर मुनगंटीवार
पोलीस डायरी जिल्हा प्रातिनिधी,चंद्रपूर, : ना. सुधीर मुनगंटीवर हे अत्यंत कर्तृत्ववान, जनतेचे प्रश्न प्रभावीपणे सोडविणारे नेते आहेत. सैनिकी स्कूल, बॉटनिकल गार्डन, वनअकादमी,रस्ते व पुलांचे बांधकाम तसेच बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र आदी क्षेत्रांत काम करून त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला चालना दिली आहे. आता अडव्हान्टेज चंद्रपूरच्या माध्यमातून लाखो युवकांना रोजगार मिळवून देण्याचे स्वप्न बाळगले आहे. सुधीरभाऊंकडे चंद्रपूर- वणी- आर्णी लोकसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन आहे असे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी काढले. त्याचवेळी ना. मुनगंटीवार यांना प्रचंड मताने विजयी करा, असे आवाहन देखील त्यांनी केले.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ आज राजुरा येथे केंद्रीय मंत्री मा. ना. श्री. नितीन गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती, त्यासभेत मतदारांना ते संबोधित करत होते. माजी केंद्रीय राज्य मंत्री हंसराज अहिर, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,देवराव भोंगळे माजी भाजपा जिल्हाध्यक्ष, माजी आमदार एड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, भाजपा नेते खुशाल बोंडे, शिवसेना जिल्हा प्रमुख बंडू हजारे, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, आरपीआय आठवले गटाचे गौतम लोडे, पी.री.पा.कवाडे गटाचे हरीश दुर्योधन, रासप जिल्हाध्यक्ष रमाकांत यादव, सुधीर घुरडे, सुनील उरकुडे, बबन निकोडे, नारायण हिवरकर, केशव गिरमाजी, महेश देवकते, अमर बोडलावार हे उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवसानिमित्त गत आठवणींना उजाळा देताना नितीन गडकरी यांनी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ‘देशाला विश्वगुरू व जगाची ताकद करण्याच्या’ स्वप्नाला उजाळा दिला. त्यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी ना. सुधीर मुनगंटीवार प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
मतदारसंघातील समस्या, बेरोजगारी ती दूर करायची असेल, तरुणांना रोजगार मिळवून द्यायचा असेल, शेतकरी, शेतमजूराचे प्रश्न आणि समस्या पाहता तलावांचे खोलीकरण करून पाणी साठवण्याची व्यवस्था काही अंशी पूर्ण झाली आहे, त्याने शेतीला पाणी मिळून चांगले उत्पादन घेता येईल, इथेनॉल, मिथेनॉल चे उदयॊग इथे स्थापन करून त्याद्वारे गावातील युवकांना रोजगार उपलब्ध होईल, त्या उद्योगात तयार होणारे इंधन विमानाद्वारे इतरत्र वितरित करता येईल, त्यासाठी राजुऱ्यात एअरपोर्ट सुरु करणार, या सर्व विकासासाठी ना. सुधीर मुनगंटीवार हाच एकच पर्याय आहे, असे ना. नितीन गडकरी म्हणाले.
मा.सुधीर मुनगंटीवार म्हणाले केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी हे रस्ते व पायाभूत सुविधांची थाली आहे, आणि ते आपले हक्काचे स्थान आहे अशा शब्दात ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. स्वत: नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असताना नितीन गडकरी प्रचारसभेला उपस्थित राहिल्याबद्दल ना. मुनगंटीवार यांनी त्यांचे आभार मानले. विकासाच्या आघाडीला कॉंग्रेसचे पंक्चर चाक लावले तर मग मात्र चंद्रपूर लोकसभेला देवही वाचवू शकणार नाही, असे सांगताना ना. मुनगंटीवार यांनी जनतेने मला निवडून दिले तर जीव ओतून काम करेल, मतदारसंघाचे प्रश्न सोडवेल, सर्वांना अभिमान वाटेल असे काम करेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.