पो. डा. प्रतिनिधी, वाशिम,: सद्यःस्थितीत माध्यमांचे स्थित्यंतर मुद्रीत माध्यमांकडून समाज माध्यमांकडे होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने विविध योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीबाबत प्रसारमाध्यमे यशकथा मांडून त्रुटी देखील निदर्शनास आणतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांनी माध्यमांची नैतिकता पाळून अशा योजनांच्या संदर्भात एक चेक एन्ड बॅलन्स ‘ व्यवस्था निर्माण करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगरागन एस. यांनी केले.
आज 15 जून रोजी वाशिम येथे केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या पत्र सूचना कार्यालय मुंबईच्या वतीने आयोजित ‘सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण’ या विषयावरील ‘वार्तालाप’ या एक दिवशीय माध्यम परिषदेचे उद्घाटन श्री. षण्मुगराजन यांनी केले. यावेळी ते आयोजित कार्यक्रमात बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, मुंबईच्या पत्र सूचना कार्यालयाच्या उपसंचालक श्रीमती जयदेवी पुजारी-स्वामी, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व नागपूरच्या पत्र सूचना कार्यालयातील माध्यम आणि संवाद अधिकारी धनंजय वानखेडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
श्री षण्मुगराजन पुढे म्हणाले, सरकारच्या श्वेत क्रांती, हरित क्रांती अशा विविध उपक्रमांची माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यात माध्यमांनी नेहमीच मोठे योगदान दिले आहे. सरकारच्या योजना किती प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचल्या आहेत, तसेच त्यांचा किती प्रमाणात नागरीकांना लाभ होतो आहे आणि या योजनांच्या उपयुक्ततेबाबत खराखुरा अभिप्राय आम्हाला प्रसार माध्यम प्रतिनिधींकडून मिळत असतो. त्यातूनच आम्हाला आमच्या कामाची दिशा निश्चित करता येते. तसेच सरकारच्या योजनांमध्ये होणारी दिरंगाई, कमतरतेची दुरुस्ती करण्याची संधी आम्हाला हा लोकशाहीचा चौथा स्तंभ देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
श्रीमती पंत म्हणाल्या, सरकारच्या योजनांची अंमलबजावणी आणि त्या योजनांना मिळत असलेले यश जनतेपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचविणे आवश्यक आहे. अनेकदा योजनांच्या अंमलबजावणीमध्ये राहिलेल्या त्रुटी अधोरेखित न करता माध्यमांनी ग्रामीण तसेच शहरी भागात राबविल्या जात असलेल्या चांगल्या योजना आणि या योजनांमुळे नागरिकांच्या जीवनमानात घडून आलेले बदल यांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवावी. वाशिम येथे आज आयोजित करण्यात आलेला ‘वार्तालाप’ हा कार्यक्रम त्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या एकदिवशीय कार्यक्रमात आकांक्षित जिल्ह्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच माध्यम प्रतिनिधींसाठी सरकारने राबविलेल्या योजना यासारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर आज चर्चासत्रे आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक करतांना, या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल उपस्थित मान्यवर तसेच माध्यम प्रतिनिधींचे आभार मानून मुंबईच्या पत्र सूचना कार्यालयाच्या उपसंचालक श्रीमती जयदेवी पुजारी-स्वामी म्हणाल्या, सरकारच्या विविध योजना तसेच उपक्रम आणि घडामोडींची माहिती इंग्रजी, हिंदी आणि मराठी या भाषांमधून विविध वृत्तपत्रे आणि माध्यम संस्थांपर्यंत पोहचवण्याचे काम पत्रसूचना कार्यालय करत आहे. याशिवाय दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांशी संपर्क साधणे आणि शासनाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हे कार्यालय वेळोवेळी विविध विषयांवरच्या चर्चासत्रांचेही आयोजन करते. पत्रसूचना कार्यालय राज्यातील तीन कार्यालयांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पत्रकारांसह सर्व पत्रकारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते आणि आजचा ‘वार्तालाप’हा कार्यक्रम म्हणजे अशाच प्रकारचा उपक्रम आहे, असे श्रीमती जयदेवी पुजारी-स्वामी म्हणाल्या. एका अर्थानं अशी परिषद म्हणजे, सरकार आणि ग्रामीण भागातील माध्यमांमध्ये एक दुवा निर्माण करणारं माध्यम आहे. कारण शहरी भागातील माध्यम प्रतिनिधींना अशी माहिती मिळविण्याचे अनेक मार्ग उपलब्ध असतात. मात्र ग्रामीण भागातील माध्यम प्रतिनिधींना अशा कार्यक्रमांच्या आयोजनातून सकारात्मक आणि विश्वसनीय माहिती पुरविण्याचे काम पत्रसूचना कार्यालय करत असल्याचे त्या म्हणाल्या.
या उद्घाटनपर सत्रानंतर अन्य व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. या सत्राची सुरुवात जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानाने केली. ते म्हणाले, जिल्ह्यातील कोरडवाहू शेतीच्या सिंचन क्षमतेत वाढ व्हावी, यासाठी जलसंधारण योजना, भूजल पुनर्भरण योजना, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार असे विविध कार्यक्रम केंद्र व राज्य सरकारमार्फत राबविण्यात येत आहे. आकांक्षित जिल्हा उपक्रम तसेच जलशक्ती अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये वाढ करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच क्षयरोगमुक्त जिल्हा, मुद्रा योजना, जननी सुरक्षा योजना, शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानांची माहिती देणे अशा योजना केंद्र सरकारमार्फत राबविण्यात येत असल्याची माहिती श्री. खडसे यांनी दिली.
जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) श्री. सोनखासकर यांनी या कार्यक्रमात ‘आकांक्षित जिल्हा विकास कार्यक्रमात माध्यमांची भूमिका’ या विषयावर सादरीकरण केले. देशभरातील 28 राज्यातील 115 जिल्हे आकांक्षित म्हणून जाहीर झाले असून त्यात राज्यातील वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. नीती आयोगाद्वारे साखरा येथे उभारण्यात आलेले मॉडेल स्कूल, जिल्ह्यातील 6 अंगणवाड्यांना मिळालेले आयएसओ मानांकन ही नीती आयोगाच्या कामाची फलश्रुती आहे. याचेदेखील वार्तांकन प्रसारमाध्यमांनी करावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. आयोगातर्फे जिल्ह्यातील क्षयरोग रुग्णांसाठी क्षयरोग तपासणी वाहन, गर्भवती महिलांसाठी फीटल डॉपलर अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना सीड ड्रेसिंग ड्रम, शेतीची अवजारे इत्यादी उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती अनिसा महाबळे यांनी ‘आकांक्षित जिल्हे उपक्रमांतर्गत कृषी आणि कृषी संलग्न क्रीया-प्रक्रीयांशी संबंधित क्षमता’ या विषयावर सादरीकरण केले. नीती आयोगातर्फे शेतकऱ्यांना सीड ड्रेसिंग ड्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यांचा वापर करून सोयाबीनचे बिजोत्पादन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्ह्यात आता तूर उत्पादन होत असून तूरडाळ प्रक्रियेला चालना मिळाली आहे. तसेच गहू, हरभरा यांच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत आहे. क्लिनिंग, ग्रेडिंग अशा प्रक्रिया सुरु झाल्या आहेत. जिल्ह्यात करडई तेल उत्पादन वाढले असून तेलघाण्या सुरु झाल्या आहेत. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनांसारख्या अनेक योजना ऑनलाईन उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना केवळ 4 कागदपत्रांच्याआधारे या योजनांचा लाभ घेता येतो. त्यांना कृषी विकास केंद्रांतून प्रशिक्षण दिले जाते. तसेच बीजभांडवल देखील पुरवण्यात येते. असे त्या म्हणाल्या.
तिसऱ्या सत्रात ‘विकास संवादात ग्रामीण माध्यमांकडून नागरिकांना उत्तम सेवा देता यावी, यासाठी पीआयबीची भूमिका यावर सादरीकरण उपसंचालिका जयदेवी स्वामी पुजारी यांनी केले. यानंतर पीएम -स्वनिधी, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या लाभार्थ्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. वाशिमच्या लाखाळा येथील तृप्ती पापड उद्योगाच्या संचालिका श्रीमती विमल राजगुरू यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा त्यांना कसा लाभ झाला याचे कथन त्यांनी यावेळी केले. त्यांनी या पापड उद्योगांतून 30 महिलांना आतापर्यंत रोजगार दिला असून यापुढे 100 महिलांना रोजगार देण्याचा मानस व्यक्त केला.
वाशिमच्या हकिम अली नगरातील पक्क्या घराचे लाभार्थी शेख हरुण यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्यांना अर्थसहाय्य मिळाले असल्याचे सांगितले.
यानंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी आपल्या प्रतिक्रिया या कार्यशाळेच्या आयोजनाबदल व्यक्त केल्या आणि प्रतिसाद संकलनाने कार्यशाळेचा समारोप झाला. कार्यशाळेचे सुत्रसंचालन प्रा. गजाजन वाघ यांनी केले. या कार्यशाळेला वाशिम जिल्हा आणि तालुक्यातील प्रसार माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.