युकेचे राजकीय आणि द्विपक्षीय वार्ताकार जॉन एम निकेल यांची अम्मा का टिफीन उपक्रमाला भेट, उपक्रमाचे केले कौतुक
पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर,:-अम्मा का टिफिन हा उपक्रम आता राज्यभर चर्चेला जात असतांना आज युनायटेड किंगडम सरकारचे फॉरेन, कॉमनवेल्थ आणि डेव्हलपमेंट ऑफिस एशिया पॅसिफिकचे राजकीय आणि द्विपक्षीय वार्ताकार प्रमुख जॉन एम निकेल यांनी आज अम्मा का टिफिन उपक्रमाची भेट घेत उपक्रमाचे कौतुक केले आहे. यावेळी गंगुबाई ऊर्फ अम्मा, आमदार किशोर जोरगेवार, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाष गौर, कल्याणी किशोर जोरगेवार, श्री महाकाली माता महोत्सव समितीचे कोषाध्यक्ष पवन सराफ, एड. दीपक चटप यांची उपस्थिती होती.
अम्मा यांच्या सुचनेनंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरात अम्मा का टिफिन हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाचे तिसरे वर्ष सुरु आहे. या उपक्रमाअंतर्गत शहरातील गरिब गरजूंना दररोज घरपोच जेवणाचा टिफिन पोहचविला जात आहे. आता या उप्रकमाची राज्यभर चर्चा असुन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नुकतीच या उपक्रमाला भेट देत कौतुक केले, तर या अगोदर अनेक मोठ्या नेत्यांनी व विविध सामाजिक संघटनांनी या उपक्रमाला भेट दिली आहे. अम्माने सुरु केलेल्या या उपक्रमाबदल अनेक संस्थाच्या वतीने अम्माला पुरस्कृत करण्यात आले आहे.
दरम्यान आज युनायटेड किंगडम सरकारचे फॉरेन, कॉमनवेल्थ आणि डेव्हलपमेंट ऑफिस एशिया पॅसिफिकचे राजकीय आणि द्विपक्षीय वार्ताकार जॉन एम निकेल यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी पोहचत सदर उपक्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी अम्माचे कार्य प्रेरणादाई असल्याचे म्हटले आहे. भारत हा सेवेकरी देश आहे. या देशाकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहे. चंद्रपूर हे सुंदर शहर आहे. येथे येण्याचा योग आला आणि या सेवेच्या उपक्रमाला भेट देता आल्याचा आनंद असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. अम्माच्या टिफिन उपक्रमाबाबत संपूर्ण माहिती यावेळी त्यांनी जाणून घेतली. उपक्रम राबविणे सहज आहे. मात्र आपण त्यात सातत्य ठेवले हे कौतुकास्पद असल्याचे ते यावेळी म्हणाले. या प्रसंगी अम्मा का टिफिन उपक्रमाची संपुर्ण चमू उपस्थित होती.