आपल्या कामाचे मूल्यमापन कोणी तरी करेल, ही अपेक्षा ठेवू नका, स्वतःला ‘अबला’ समजणे बंद करा आणि स्वतःला ‘सबला’ समजा: असे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांचे महिलांना आवाहन
पोलीस डायरी प्रतिनिधी वाशीम, :आपल्या कामाचे मूल्यमापन कोणी तरी करेल, ही अपेक्षा ठेवू नका. स्वतःला ‘अबला’ समजणे बंद करा आणि स्वतःला ‘सबला’ समजा, असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी आज येथे केले.
जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांसाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा नियोजन भवनातील सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी प्रियंका गवळी, माविमचे जिल्हा समन्वयक राजेश नागपूरे, रिसोड तहसीलदार प्रतिक्षा तेजणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली.
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस पूढे म्हणाल्या की, ज्या दिवशी आपल्या कामाची दखल कुणीतरी घ्यावी याची आवश्यकता भासणार नाही, त्यादिवशी आपण स्वावलंबी झालो असे समजावे. गृहिणी म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला ह्या काहीच करत नाहीत असे कुणीही समजू नये. २०२४ हे निवडणुकांचे वर्ष आहे. मतदान प्रक्रियेपासून जिल्ह्यातील एकही महिला वंचित राहू नये. कमावत्या पुरुषाच्या बरोबरीने व समांतर काम गृहिणी करत असते, असेही त्यांनी सांगितले. स्वतःच्या आवडीने काम करावे व आपल्या कामाची गुणवत्ता आपणच ठरवावी, असेही त्यांनी उपस्थित महिलांना सांगितले.