धरण, नाल्यातील गाळ काढण्याची मोहिम राबवावी
-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
पोल्स डायरी,बुलडाणा, प्रतिनिधी, : धरणातील गाळ काढणे आणि नाला खोलीकरणासाठी राज्य शासनाने निर्देश दिले आहेत. यासाठी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील पुरामुळे गाळ साचल्याने नाला खोलीकरणास वाव आहे. त्यामुळे जिल्ह्यात धरण आणि नाल्यातील गाळ काढण्यासाठी मोहिम राबवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.
धरण आणि नाल्यातील गाळ काढण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल मुंडे, मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी, गाळमुक्त धरण आणि नाला खोलीकरणासाठी जलयुक्त शिवार योजनेतून कार्य करण्यात येत आहे. तसेच सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे जलसंधारण विभागाने धरणामध्ये किती गाळ साचला आहे, याची माहिती घेण्यात यावी. हा गाळ काढण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी तातडीने पावले उचलावीत. निवडण्यात आलेल्या संस्थांना तालुकानिहाय कामे वाटप करण्यात यावीत. धरणातील गाळ काढण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे संस्थांनी जास्तीत जास्त गाळ काढण्यासाठी प्रयत्नशील व्हावे.
जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील पुरामुळे नाल्यांमध्ये गाळ साचला आहे. तसेच पाण्याचा प्रवाह बंद झाला आहे. हा गाळ प्राधान्याने काढण्यासाठी पावले उचलावीत. नाला खोलीकरण हे वर्षभर चालणार आहे. त्यामुळे आवश्यक असलेल्या निधीची मागणी आतापासूनच करण्यात यावी. गाळ काढण्यासाठी राज्य शासनाचा आर्ट ऑफ लिव्हींग सोबत करार झाला आहे. त्यामुळे ज्याठिकाणी संस्था उपलब्ध नसल्यास अशी गावे आर्ट ऑफ लिव्हिंगला देण्यात यावी. गाळ काढण्यासाठी डिझेलचा खर्च स्वयंसेवी संस्थांना देण्यात येणार आहे. त्यामुळे दिलेली कामे पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात कामांना प्रत्यक्ष सुरवात करण्यात यावी.
पिण्याचे पाणी आणि आवश्यकता भासल्यास सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असल्याने धरणातील गाळ काढण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हींगने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात 41 ठिकाणी ही संस्था कार्य करणार आहे. ही कामे तातडीने सुरू होण्यासाठी स्वयंसेवी संस्थानी प्रयत्नशील राहावे. गाळ काढण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री आतापासूनच तयार ठेवण्यात यावी. ज्या धरणामध्ये पाणीसाठी शिल्लक राहिलेला नाही, तेथे तातडीने कामे सुरू करावीत. तसेच गाळ घेऊन जाण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांशी संपर्क साधावा, असेही डॉ. पाटील यांनी यावेळी सांगितले.