विकास आराखड्यासाठी विभागानी सूचना कराव्यात – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
पोलीस डायरी प्रतिनिधी, बुलडाणा, : देशाच्या पाच ट्रिलीयन अर्थव्यवस्थेसाठी जिल्हा केंद्रबिंदू मानण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याची बलस्थाने ओळखून प्रत्येक विभागाने आर्थिक विकासासाठी अल्प आणि दिर्घ कालावधीसाठी पाच सूचना कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
जिल्हा नियोजन सभागृहात जिल्ह्याच्या विकास आराखडा संदर्भात बैठक घेण्यात आली. जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड, गोखले इंस्टिट्यूटचे प्रा. नरेश बोडके उपस्थित होते. यावेळी जिल्ह्याची बलस्थाने, कमजोरी आणि त्यानुषंगाने करावयाच्या कार्यवाही संदर्भात सादरीकरण करण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासानुसार प्रत्येक विभागाने नियोजन करावे. यात जिल्ह्याचे बलस्थाने आणि कमजोरी लक्षात घ्यावी. जिल्ह्यात प्रामुख्याने कृषि क्षेत्रात नियोजन करून त्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. तसेच कौशल्य प्रशिक्षण दिल्यास यातून विकासाच्या संधी वाढविता येऊ शकणार आहे.
जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यासाठी प्रत्येक विभागाने योगदान देणे आवश्यक आहे. हा आराखडा अल्प, मध्यम आणि दिर्घ मुदतीचा तयार करण्यात येणार आहे. यामुळे आरोग्य आणि सामाजिक क्षेत्राचा महत्वाचा वाटा राहणार आहे. कृषि हे महत्वाचे क्षेत्र असून शेतकऱ्यांचे उत्पन् दुप्पट करण्यासाठी क्लस्टर उभारण्याची गरज आहे. यासाठी व्हीजन देणे आवश्यक आहे. कृषि क्षेत्राला पशूसंवर्धन विभागाची जोड देणे आवश्यक आहे. या आराखड्याचा शेतकरी हा गाभा असणार आहे. कृषि क्षेत्रात मुल्यवर्धीत साखळी निर्माण झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्ना निश्चितच वाढ होणार आहे.
येत्या काळात जिल्ह्याच्या विकासासाठी निधी देताना विकास आराखडा विचारात घेतल्या जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात विकासकामे करताना आणि जिल्ह्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रत्येक विभागाने यात योगदान देणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाने पाच दिर्घ आणि पाच अल्प मुदतीच्या विकासाची कामे सूचविण्याचे आवाहन डॉ. पाटील यांनी केले.
जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यासाठी पुणे येथील गोखले इंस्टिट्यूटशी करार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील आणि प्रा. नरेश बोडके यांनी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या करारामुळे गोखले इंस्टिट्यूट विकास आराखड्याशी संबंधित एकत्रित करण्यात आलेल्या डाटावरून महत्वपूर्ण सूचना करणार आहे.