नायलॉन मांजा निर्मिती, वापर व विक्री करणाऱ्यावर होणार कार्यवाही
पोलीस डायरी, हर्षल चिपळूणकर, बुलडाणा, : मकर संक्रांतीच्या अगोदर व नंतर काही दिवस पतंग उडविण्याचे प्रमाण जास्त असते. त्यासाठी नायलॉन मांजा (दोरा) या धाग्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. तसेच या मांजामुळे मानवी जीवितास, पशु-पक्षी यांच्या जीवितास धोका निर्माण होऊन जखमी व मृत होण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पर्यावरण अधिनियमानुसार संपूर्ण जिल्ह्यात नायलॉन मांजाचा वापर, विक्री व निर्मिती करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, साठवणुकदार यांना नायलॉन मांजाची विक्री व साठवणुक करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस विभाग यांनी स्वतंत्ररित्या पथके तयार करुन आवश्यक ती कार्यवाही करावी. सदर आदेशाचे कोणतीही व्यक्ती वा संस्था यांनी उल्लंघन केल्यास पर्यांवरण(संरक्षण) अधिनियम 1986 चे कलम 15 अन्वये शिक्षेस पात्र राहिल, असे जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशात नमूद आहे.