सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार ऍक्शन मोड वर
पोलीस डायरी, हर्षल चिपळूणकर, सांस्कृतिक व सामाजिक प्रबोधनाबरोबरच सांस्कृतिक कार्य विभागाशी निगडीत विविध माध्यमातून रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात होत असून विभागांच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीत आगामी 100 दिवसात करावयाचे उपक्रम, योजना, प्रकल्प, कार्यक्रम आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यात एक खिडकी योजनेअंतर्गत चित्रीकरणासाठी तयार करण्यात आलेली ऑनलाईन प्रणाली महाराष्ट्रभर लागू करणे, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचा पुनर्विकास करून उद्घाटन सोहळा आयोजित करणे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विशेष प्रकाशन सोहळा आयोजन करणे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा अशा विविध विषयांसंदर्भात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांनी आढावा घेतला.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक डॉ.धनंजय सावळकर, उपसचिव महेश वाव्हळ, उपसचिव नंदा राऊत, अवर सचिव बाळासाहेब सावंत, अवर सचिव परसराम बहुरे, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभीषण चवरे, दर्शनिका विभागाचे संपादक डॉ.दिलीप बळसेकर, पु.ल. महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षणचे सचिव संतोष खामकर, राज्य साहित्य अकादमीचे सहसंचालक सचिन निंबाळकर, पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजित कुमार उगले आदी उपस्थित होते.