पो. डा. वार्ताहर : महाराष्ट्रात सध्या होणाऱ्या राजकीय घडामोडींचे घटनाक्रम पाहता राजकारणाची विश्वासर्हता, जबाबदारीची नैतिक मूल्य या सगळ्यांच्या विषयी मतदारांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होतोय तसेच आपला आतील आवाज म्हणतोय साहेबांसोबतच राहावं , म्हणून मी साहेबांसोबतच राहणार असे अमोल कोल्हेनी स्पष्ट केले आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदारांनी जे मतदान केलं ते एका विचारधारेवर विश्वासावर ठेऊन केले असल्याने मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून मी माझा खासदार पदाचा राजीनामा शरद पवार साहेबांकडे देणार असल्याची माहिती शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खा. डॉ अमोल कोल्हे यांनी दिली.
अमोल कोल्हे यांनी वृत्त प्रतिनिधींशी बोलताना प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते पुढे म्हणाले की, मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेद्वारे इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून मी नैतिक मुल्याच्या बरोबरच राहणं मला योग्य वाटते, सर्व राजकारण पाहता आपण आपला राजीनामा शरद पवार साहेबांकडे सादर करणार असल्याचे खासदार कोल्हे यांनी स्पष्ट केले.
खासदार डॉ. अमोल कोल्हे हे अजित पवार यांच्या शपथविधिला उपस्थित असल्याने ते अजित पवार सोबतच असल्याची चर्चा रविवारी ( दि.२ ) दिवसभर रंगली होती. कोल्हे म्हणाले की, मतदारांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होतोय तसेच माझा आवाज सांगतोय की, मी शरदचंद्रजी पवार यांच्या सोबतच राहावं , म्हणून मी त्यांच्या सोबतच राहणार आहे. अजित पवार यांच्या शपथविधी प्रसंगी उपस्थिती बाबत खुलासा करताना कोल्हे म्हणाले की, आपण वेगळ्या कारणासाठी अजितदादांना भेटायला गेलो होतो, त्यावेळी आपणास कोणतीही कल्पना नव्हती की आज शपथविधी आहे. तेथे गेल्यानंतर शपथविधी असल्याची माहिती समजली. त्याचवेळी आपण कार्यालयाला राजीनामा तयार ठेवण्यास सांगितले होते. कारण मतदारांचा विश्वास तोडून यासाठी आपण राजकारणात आलेलो नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदारांनी जे मतदान केलं आहे ते एका विचारधारेवर, विश्वास ठेवून केलं आहे.
मंगळवारी राजीनामा सादर करणार
गेली चार वर्ष शिरूर मतदार संघातील प्रश्नांची मांडणी करत असताना केंद्राच्या पॉलिसीवर, विचारधारेवर टीका करीत असताना, आपण विरोधी भूमिका घेतली आणि अचानक हे आपण कसे बदलू शकतो, हा प्रश्न माझ्या मनात, माझ्या समोर होता. म्हणून मी पवार साहेबांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. पवार साहेबांची मुंबई येथे मंगळवारी भेट होणार असून तेथे आपण आपला राजीनामा सादर करणार आहोत, अशी भूमिका राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मांडली आहे