जिल्ह्यातील पहिल्या प्रतिपालक जोडप्याला मंजूरी
पोलीस डायरी प्रतिनिधी, बुलडाणा, :कुटुंबांशिवाय बालगृहात राहणाऱ्या बालकांना आई-वडील, नातेवाईक, शेजारी आणि मित्र परिवार मिळावा आणि बालकांचा योग्यरित्या सांभाळ व्हावा, यासाठी जिल्हा बाल संरक्षण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जिल्ह्यातील पहिल्या प्रतिपालक जोडप्याला मंजुरी दिली. यात एका नऊ वर्षीय बालकाला आज प्रतिपालकांना सुपूर्द करण्यात आले.
केंद्र शासानच्या मिशन वात्सल्य योजनेत एक पालक, अनाथ निराधार आणि पालकांकडून सांभाळ करण्यास असमर्थ असलेल्या बालकांचा सांभाळ महिला व बाल विकास विभागाच्या देखरेख संस्थामध्ये केला जातो. ही बालके संस्थेत राहून आपल्या जैविक पालकांची वाट बघत असतात. मात्र अनेकवेळा आई, वडील मृत्यू पावणे, घटस्फोट होणे, कायम अपंगत्व आल्याने व जैविक पालकांच्या संमती अभावी बालकांना कायद्याने दत्तक देता येत नाही, अशा बालकांना संस्थेत राहून आपले जीवन जगावे लागते. मात्र केंद्रीय मिशन वात्सल्य योजनेमध्ये अशा बालकांना तात्पुरत्या स्वरूपात कुटुंबात दाखल करून सामान्य बालकाप्रमाणे जीवन जगता यावे, याकरिता प्रतिपालक योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
घिरणी, ता. मलकापूर येथील चव्हाण कुटुंबानी बुलडाणा येथील शासकीय मुलांचे निरीक्षणगृह, बालगृह येथे मागील एक वर्षापासून कुणीही भेटायला आलेले नसलेल्या, तसेच बालकांचे जैविक पालक बालकाचा सांभाळ करण्यास असमर्थ असल्याची निश्चिती बाल कल्याण समिती बुलडाणा यांनी केल्याने एका 9 वर्षीय बालकाला चव्हाण कुटुंबियांना प्रतिपालक योजनेत सुपूर्द करण्यात आले. कायदेशीर सर्व प्रक्रिया करून जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा प्रतिपालक आणि प्रायोजकत्व मान्यता समिती यांनी यास मंजूरी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी, केंद्रीय मिशन वात्सल्य योजनेमध्ये बालगृहात दाखल असलेल्या आणि कायदेशीर अडचणीमुळे कायमस्वरूपी दत्तक जाऊ शकत नसणाऱ्या बालकांना तात्काल कुटुंब मिळून देणे, तसेच बालकांचा सांभाळ करण्यास तयार असलेल्या पालकांना गरजेनुसार सदर बालकाचा सांभाळ करण्यासाठी अर्थसहाय्य देण्यास मंजुरी करण्यात आली आहे. बालकांचे जबाबदार पालक होण्याची ही एक कायदेशीर सुवर्णसंधी आहे. निपुत्रिक व मानसिक, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम पालकांनी प्रतिपालक आणि प्रायोजकत्वासाठी पुढे यावे आवाहन केले आहे.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी महिला व बाल विकास, पालकांच्या दुर्लक्षतेने पिडीत आणि बालकांचा सांभाळ करण्यास असमर्थ असणाऱ्या व्यक्तींच्या मुलांचा सांभाळ करण्यास आणि त्यांना योग्य त्या कुटुंबात पुनस्थार्पित करण्यास सक्षम आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अशा बालकांची देखरेख प्रतिपालक योजनेत करण्यात येणार असल्याने ज्या पालकांना स्वत:चे मूल नाही आणि मूल दत्तक घेण्यास असमर्थ आहे, अशा बालकांना संस्थेतील बाळकांची जबाबदारी पालक म्हणून घेता येत असल्याचे सांगितले.
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांनी, संस्थेत राहून जीवन जगणाऱ्या बालकांसाठी घेण्यात आलेला हा निर्णय महत्वाचा आहे. ज्या पालकांना मुलबाळ नाही आणि बालकांचे प्रतिपालक बनायचे आहे, त्यांनी स्थानिक बाल संरक्षण समितीकडे चौकशी करावी. जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत इच्छुक कुटुंब आणि बालक यांच्या संमतीने आणि मिशन वात्सल्य योजनेच्या मार्गदर्शिका प्रमाणे आपल्याला प्रतिपालक योजनेचा लाभ घेता येईल. सदर योजनेचे निकष cara.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.