नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणीसाठी नोंदणी करावी – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
पोलीस डायरी प्रतिनिधी, बुलडाणा, : जवाहर नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणीसाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम, तसेच अतिदुर्गम भागातील प्रतिभावंत, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत प्रवेश प्रक्रियेची माहिती पोहाचविण्यासाठी जिल्हा परिषदेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा. मागील वर्षी 12 हजार 379 विद्यार्थ्यांनी निवड चाचणीसाठी नोंदणी केली होती. यात यावर्षी किमान 10 टक्के वाढ होणे अपेक्षित आहे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयांतर्गत नवोदय विद्यालय समितीतर्फे संपूर्ण देशभरात शैक्षणिक सत्र 2024-25 करीता इयत्ता सहावीतील प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी दि. 18 जानेवारी 2025 रोजी घेतली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थी व त्यांच्या पालकांना दि. 16 सप्टेंबर 2024 पर्यंत navodaya.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करुन प्रवेश अर्ज भरावे लागणार आहे.
विद्यार्थी हा जिल्ह्यातील शासन मान्यताप्राप्त शाळेत पाचवीत शिकत असावा. विद्यार्थ्यांची जन्मतारीख 1 मे 2013 ते 31 जुलै 2015 मधील असावी. विद्यार्थी तिसरी व चौथी शासनमान्य शाळेतून सलग उत्तीर्ण असावा. शासनाच्या नियमानुसार 75 टक्के ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची निवड केली जाते. अपंग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, तसेच मुलींना शासन नियमानुसार प्राधान्य देण्यात येणार आहे.. प्रमाणपत्राची अचूक माहिती भरताना यू-डायस प्लसमधील विद्यार्थ्यांचा विद्यार्थी कोड क्रमांक हा संबधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडून प्राप्त करुन घ्यावा लागणार आहे. मुख्याध्यापकांची सही व शिक्क्यासह प्रमाणपत्र संपूर्ण माहिती भरुन अपलोड करावे लागणार आहे. प्रवेश अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरले जाणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे जवाहर नवोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. आर. कसर यांनी कळविले आहे.