आपत्कालीन परिस्थितीमध्ये समन्वयाने कार्य करावे -जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
पोलीस डायरी, हर्षल चिपळूणकर, जिल्हा प्रतिनिधी,बुलडाणा, : येत्या मान्सून कालावधीत प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीमध्ये सतर्क राहावे, पूर किंवा अपघाताची स्थिती ही अचानक उद्भवल्याने यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज मान्सून पूर्व तयारी आणि दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भात केलेल्या उपाययोजनांच्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, समाधान गायकवाड, जयश्री ठाकरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार, तहसिलदार संजिवनी मुपडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीमध्ये संपर्क, वाहतूक व्यवस्था आणि गोल्डन अवर या बाबी महत्वाच्या आहेत. त्यामुळे तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावरील आपत्कालीन कक्षांनी संपर्कात राहावे. पावसाळ्याच्या दिवसात वाहनांच्या अपघाताची शक्यता असल्याने प्रामुख्याने समृद्धी मार्ग असलेल्या तालुक्यातील यंत्रणांनी सतर्क राहावे. प्रामुख्याने वाहन घसरून अपघात होण्याची शक्यता असल्याने या भागात जेसीबी, गॅस कटर, रूग्णवाहिका आदींची व्यवस्था ठेवण्यात यावी.
ग्रामीण भागातील पूराची स्थिती हाताळण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी सजग व्हावे. पूराच्या परिस्थितीबाबत कोतवाल आणि पोलिस पाटील यांच्याकडून दवंडी देण्यात यावी. पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी तालुकास्तरावर अंतर्गत बैठक घेण्यात यावी. तसेच प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा समिती स्थापन करण्यात यावी. या समितीशी आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधता येईल. अतिवृष्टीच्या काळात वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. शहरातील मॅनहोल उघडण्यात येऊ नये. उघडल्यास बॅरेकेटींग करण्यात यावे. पुराच्या काळात नागरिकांना स्थलांतरीत करण्याची आवश्यकता भासल्यास निवारा केंद्राच्या ठिकाणी सुविधा पुरविण्यात याव्यात.
पूर परिस्थितीमध्ये पावसाच्या प्रमाणावर लक्ष ठेवण्यात यावे. त्यासाठी आंतरजिल्हा समन्वय ठेवण्यात यावा. नागरिकांना मदत करण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करावेत. पूराच्या काळात सार्वजनिक उद्घोषणेची व्यवस्था करण्यात यावी. वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावरील वाळलेली झाडे उन्मळून पडून घरे, वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी झाडे तोडण्यात यावी. धरण क्षेत्रात पाऊस जादा झाल्यास पाणी सोडण्यात येते. याची माहिती बाधित क्षेत्रातील नागरिकांना देण्यात यावी. पाणी सोडल्यामुळे शेती आणि घरांचे नुकसान होऊ नये, याची काळजी घ्यावी.
उन्हाळाच्या कालावधीत चाराटंचाई जाणवणार नाही, यासाठी नियोजन करण्यात यावे. शहरातील पाणी पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करावेत. आवश्यकता पडल्यास टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच कुपननलिका आणि विंधन विहिरी अधिग्रहित करण्यात येत आहे. येत्या कालावधीत आवश्यकतेनुसार पाणी पुरवठ्याच्या उपाययोजना करण्यात येतील. जलजीवन मिशनचा आढावा घेण्यात यावा. गाळमुक्त धरण, गाळयुक्त धरण उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने गाळ काढण्यात येत आहे. यामुळे पाणीसाठा वाढण्यास मदत होणार असल्यामुळे यंत्रणांनी सहकार्य करावे. तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांनी पाण्याचे स्त्रोत तपासण्यात यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी दिल्या.