महिलांनो! मतदानात खारीचा नव्हे सिंहाचा वाटा द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर, :- मतदार यादीत निम्मे मतदार महिला आहेत. महिलांनी मतदानात आपला खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा द्यावा. महिलांचे सर्वाधिक मतदान असलेला जिल्हा आणि महिला मतदार ह्या सुजाण नागरिक असल्याची ओळख निर्माण करण्याच्या संधीचे सोने करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले.
महिला मतदार जनजागृती उपक्रमाअंतर्गत आज जिल्हा नियोजन सभागृहात आज उच्चशिक्षित व स्वयंसिद्ध महिलांची बैठक बोलावण्यात आली होती. विविध सामाजिक संस्था, उच्च शिक्षित, चार्टर्ड अकाऊंटंट, डॉक्टर्स, वकिल, उद्योजक, अशा विविध क्षेत्रात सक्रिय असलेल्या महिलांना या बैठकीस बोलावण्यात आले होते. स्वीप नोडल अधिकारी सुदर्शन तुपे, सहा, नोडल अधिकारी स्वप्निल सरदार, अंकुश पांढरे आदी अधिकारी तसेच ॲड. शेरखाने, आरजे अर्जना, आयएमएच्या डॉ. रेणू, डॉ. उज्ज्वला झंवर, ॲड. रेणूका घुले, डॉ. सुषमा शिंदे, डॉ. कांचन रोपळेकर आदी विविध क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, आपण विविध क्षेत्रात नाव लौकीक मिळवलेल्या महिला आहात. आपण तर मतदान करालच. मात्र आपण आपल्या संपर्कातील तसेच आपल्या माध्यमातून इतर महिलांनाही मतदानासाठी प्रेरित करावे. आपली लोकशाही जगात सर्वात मोठी लोकशाही आहे. आपण आपल्या भावी पिढ्यांसाठी त्यांच्या जगण्यासाठी पैसा, मालमत्ता यांची तरतूद करण्यासाठी झटतो. मात्र पुढच्या पिढीला लोकशाहीचे मुक्त वातावरण लाभावे यासाठी आपण काय करतो? त्यासाठीच मतदान करणे आवश्यक आहे. आपल्या एका मताने काय फरक पडेल? असा प्रश्नही काही जण उपस्थित करतात. मात्र एका मतानेच फरक पडतो. मतदानाबाबत उदासिनता ही बाब अत्यंत घातक आहे. ही उदासिनता दूर करण्याचे प्रयत्न आपल्या संपर्कातून आपण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले. मतदान करुन आपण सुजाण नागरिक असल्याचे सिद्ध करण्याची संधी आली आहे. आपण महिलांनी मतदानात खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा उचलून महिला ह्या सुजाण नागरिक असल्याचे सिद्ध करावे. देशात आपल्या जिल्ह्यात महिलांचे सर्वाधिक मतदान नोंदविले जावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रास्ताविक स्वप्निल सरदार यांनी तर आभारप्रदर्शन अंकुश पांढरे यांनी तर संजीव सोनार यांनी सुत्रसंचालन केले.