मतदान केंद्रावर जाण्यासाठी चार हजार ‘प्रथमोपचार किट’ सज्ज
पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर, :- प्रत्येक मतदान केंद्रावर एक प्रथमोपचार किट देण्यात येणार आहेत. जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे तशी प्रशासनाची तयारी सुरु आहे. आज आरोग्य विभागामार्फत द्यावयाच्या चार हजार वैद्यकीय प्रथमोपचार किट सज्ज करुन प्राथमिक आरोग्य केंद्रांवर रवाना करण्यात आल्या, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी दिली.
जिल्ह्यात दि. १३ रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. उन्हाळ्याचा कालावधी लक्षात घेता. निवडणूक प्रक्रियेतील मतदान केंद्रावर कार्यरत कर्मचारी अथवा आलेले मतदार यांच्यापैकी कुणास काही त्रास झाल्यास तातडीने प्रथमोपचार करणे शक्य व्हावे म्हणून प्रथमोपचार किट देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले होते. त्यानुसार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या मार्गदर्शनात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक व आरोग्य यंत्रणेतील अन्य विभागांनी हे प्रथमोपचार किट तयार केले आहे.
असे असेल प्रथमोचार किट
हे प्रथमोपचार किट हे एका झिपर पॉलिथीन पाऊच मध्ये देण्यात आले आहे. त्यात पॅरासिटॅमॉल टॅबलेट, ओआरएस पाऊच, ॲन्टासिड टॅबलेट (जेल्युसिल व ऑमेपॅरॉझॉल), सिट्रिझिन, सायक्लोपाम, ॲटीबायोटिक्स, बेटाडीन ट्युब, सर्जिकल कापूस, बॅण्डेज पट्टी, डेटॉल साबण इ. औषधी व प्रथमोचार साहित्य देण्यात आले आहे.
२३७४ आरोग्य कर्मचारी तैनात
तसेच प्रत्येक निवडणुक बुथवर पाळणाघराची सुविधा, दिव्यांग मतदारांसाठी व्हिलचेअर्स उपलब्ध असणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रियेदरम्यान मतदार व कर्मचारी यांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवण्यासाठी १९१सामुदाय आरोग्य अधिकारी, ३५०आरोग्य कर्मचारी (महिला व पुरुष ), १८३३आशा स्वयंसेविका असे एकुण २३७४अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले असुन तेथे २४ तास वैद्यकीय अधिकारी व आवश्यक कर्मचारी उपस्थित ठेवण्यात आले आहेत.
मतदारांना मतदान केंद्रावर आवश्यक त्या आरोग्य सेवा मिळणार आहे. त्यामुळे आरोग्याबाबत चिंता न करता निर्भयपणे मतदान करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी विकास मीना व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी केले आहे.