पो. डा. वार्ताहर , वाशिम : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,वाशिमच्या वतीने आयोजित ६२ वी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा २७ जुलै २०२३ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, वाशिम येथे आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघ व खेळाडूंची १४ व १७ वर्ष अशा दोन वयोगटात स्पर्धा घेण्यात येणार आहे. १४ वर्षाखालील मुलांकरीता वय १ जानेवारी २०१० किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. १७ वर्ष वयोगटात मुले व मुलींकरीता १ जानेवारी २००७ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले असावे. ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा १४ ते २३ सप्टेंबर २०२३ या कालावधीत दिल्ली व बंगलोर येथे आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना जिल्हास्तर स्पर्धेपुर्वीच www.subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू व संघांची नोंदणी करणे आवश्यक आहे. जे संघ स्पर्धेत सहभागी होणार आहे. अशा संघानी आपला प्रवेश अर्ज २५ जुलै २०२३ रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत प्रवेश शुल्क व शाळा नोंदणी शुल्क जमा करणे आवश्यक आहे.
विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धा लवकरच असल्यामुळे स्पर्धेतील विजयी संघांनी तयारीत राहावे. सोबत खेळाडूंकडे जन्म दाखला, आधार कार्ड, पासपोर्ट व शाळेचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. या स्पर्धेमध्ये जिल्हयातील जास्तीत जास्त संघाने सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी केले आहे.