पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर :
सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी करीता शेतकऱ्यांकडील राखीव साठ्यामधील बियाण्याची किमान तीन वेळा घरगुती पद्धतीने चाचणी घेणे आवश्यक आहे. (बियाणे साठवणूक करतेवेळी, मार्च/एप्रिल व पेरणीपूर्व) त्यामुळे मार्च/एप्रिल मध्ये राखीव साठ्याची घरगुती पद्धतीने बियाण्याची उगवण चाचणी करण्यात यावी.
उगवणक्षमता घरच्या घरी तपासण्याची पध्दत : 1.शेतक-यांनी स्वत:कडे असलेल्या बियाण्याची चाळणी करून त्यामधील काडीकचरा, खडे, लहान/फुटलेले बियाणे वेगळे करावे. चाळणीनंतर स्वच्छ झालेले एका आकाराचे बियाणे चाचणीसाठी निवडावे. वर्तमानपत्राचा एक कागद घेऊन त्याला चार घड्या पाडाव्यात यामुळे कागदाची जाडी वाढेल. नंतर तो पूर्ण कागद पाण्याने ओला करावा. प्रत्येकी 10 बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून वर्तमानपत्राच्या टोकाच्या भागावर ठेवून त्याची गुंडाळी करावी. अशा रितीने 100 बियांच्या 4 गुंडाळ्या तयार कराव्यात. नंतर या गुंडाळ्या पॉलिथिन पिशवीत चार दिवस तशाच ठेवाव्यात. चार दिवसानंतर त्या हळुहळु उघडून पाहून त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजाव्यात. जर ती संख्या 50 असेल तर उगवणक्षमता 50 टक्के आहे असे समजले जाते. जर ती संख्या 80 असेल तर उगवणक्षमता 80 टक्के आहे असे समजावे. अशा पध्दतीने उगवणक्षमतेचा अंदाज घेता येतो. सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता चांगली म्हणजेच 70 ते 75 टक्के असेल तर शिफारस केलेल्या मात्रेनुसार प्रति हेक्टर 75 किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे.
2) शेतकऱ्यांनी स्वतःकडील बियाणे वापरण्यापुर्वी त्याची उगवणक्षमता वरील पध्दतीने तपासून नंतरच अशा बियाण्याची पेरणी करावी. उगवणक्षमता 70 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास त्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे.
सोयाबीन बियाण्याचा पेरणीसाठी वापर करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी :
1) रायझोबियम व पीएसबी या जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास पेरणीपुर्वी 3 तास अगोदर बीज प्रक्रिया करून असे बियाणे सावलीत वाळवावे. 2) पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगापासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. 3) 75 ते 100 मि.मी. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी. 4) बियाण्याची पेरणी पुरेशा ओलीवर आणि 3 ते 4 से.मी. खोलीपर्यंत करावी. 5) प्रति हेक्टरी दर 70 किलो वरून 50 ते 55 किलो आणण्यासाठी सोयाबीन बियाणे टोकण पद्धतीने किंवा प्लांटरच्या सहाय्याने रुंद वरंबा सरी पद्धत (बीबीएफ) यंत्राने करावी.
अधिक माहिती करीता कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. पेरणीपूर्व सोयाबीन बियाणे उगवणक्षमता, बीजप्रक्रिया शेतकरी बंधुनी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.