पो.डा. वार्ताहर, छत्रपती संभाजीनगर : सूक्ष्म निरीक्षकांनी टपाली मतदान प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या दिलेल्या निर्देशाप्रमाणे पूर्ण करून अहवाल सादर करावे, त्याचप्रमाणे मतदान केंद्रावर सूक्ष्म निरीक्षकाने आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदान प्रक्रिया आवाहन आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सूक्ष्म निरीक्षक यांचे प्रशिक्षण कार्यक्रमात दिले.
जिल्हा नियोजन समिती सभागृहांमध्ये सूक्ष्मनिरीक्षक व टपाली मतदानातील सूक्ष्म निरीक्षक यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणास निवडणूक निरीक्षक (सामान्य) कांतीलाल दांडे, निवडणूक निरीक्षक (पोलीस) राजशेखर एन., उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, टपाली मतदान नोडल अधिकारी प्रभोदय मुळे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी चंद्रकांत पाटील, जिल्ह्यातील सर्व सुक्ष्म निरीक्षक, मतदान केंद्र अधिकारी,या प्रशिक्षणास उपस्थित होते.
सूक्ष्म निरीक्षकाबरोबरच मतदान केंद्र अधिकारी, केंद्रस्तरीय अधिकारी व सूक्ष्म निरीक्षक यांचे गृह मतदान, टपाली मतदान प्रक्रिया आणि मतदान केंद्रावर होणारे प्रत्यक्ष मतदान या प्रक्रिया सूक्ष्म निरीक्षकांनी निवडणूक आयोगाच्या नेमून दिलेल्या निर्देशाप्रमाणे पार पाडावी. टपाली मतदानामध्ये फोटोग्राफर, पोलीस कर्मचारी, नेमून दिलेले वाहन दिलेल्या रूटमॅप प्रमाणे नोंदीत वृद्ध आणि दिव्यांग मतदारांचे मतदान दिलेल्या मतपत्रिकेवर करून घ्यावे. जिल्ह्यामध्ये ठरवून दिलेल्या तारखेस मतदान प्रक्रिया पूर्ण करून त्याचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर करावा, असे निर्देश स्वामी यांनी दिले.
मतदान प्रक्रियेचे नोडल अधिकारी चंद्रकांत पाटील यांनी सूक्ष्म निरीक्षकांनी मतदान प्रक्रियेमध्ये घ्यावयाची काळजी, नमुना अर्ज क्रमांक १२ डी, टपाली मतदान पथक,प्रक्रिया, गृहभेटीचे वेळापत्रक, मतदार यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक, सुविधा केंद्र याबाबतच्या सर्व सूचना दिल्या.
निवडणूक प्रक्रिया निर्भय व निष्पक्ष पार पाडण्यासाठी योगदान द्यावे- कांतीलाल दांडे
सूक्ष्म निरीक्षकांनी मतदाराला मतदान करण्यासाठी निष्पक्ष आणि निर्भय वातावरण उपलब्ध करणे आणि तसा विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. सुक्ष्म निरीक्षकांनी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडतांना हीच जबाबदारी पार पाडावी. मतदान केंद्रावरील सर्व अहवाल नोंदी करून अहवाल सादर करावेत. यामध्ये राजकीय पक्षाचे एजंट, प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया, मतदान प्रक्रिया सुरू झाल्याची वेळ, मतदान प्रक्रिया संपल्याची वेळ इ. नोंदी घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अहवाल सादर करावे.
राजशेखर एन यांनी सांगितले की, मतदान केंद्रावर कायदा सुव्यवस्था आणि निर्भयपणे वातावरणात मतदान करता यावे याची मतदाराला खात्री वाटली पाहिजे. संवेदनशील मतदान केंद्रावर वेब कास्टिंग च्या माध्यमातून आयोगाचे लक्ष राहिल. मतदान प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात पूर्ण करावी. जबाबदारी पार पाडाल विश्वास त्यांनी व्यक्त केला.