पो.डा. वार्ताहर , छत्रपती संभाजीनगर :
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ जाहीर झाल्यापासून स्थापन झालेल्या आचार संहिता कक्षात गेल्या महिनाभरात १६३ तक्रारी सी- व्हिजिल (C-VIGIL)ॲपद्वारे प्राप्त झाल्या. त्यातील १४३ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले व सर्वच्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात आले. तक्रारी निराकरणाचा सरासरी कालावधी ४५ मिनीटे ५५ सेकंद इतका होता, अशी माहिती आचारसंहिता कक्षाचे सहा.नोडल अधिकारी किशोर घोडके यांनी दिली.
लोकसभा निवडणूक २०२४ ची घोषणा भारत निवडणूक आयोगाने केली तेव्हापासून म्हणजेच दि.१६ मार्च २०२४ पासूनच आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना हे या कक्षाचे नोडल अधिकारी आहेत. दि.१६ मार्च ते १७ एप्रिल या एक महिन्याच्या कालावधीत सी व्हिजील या ॲपवर १६३ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यांचे विवरण याप्रमाणे- पैशांचे वाटपाबाबत-४, बंदी असतांना प्रचार केल्याबाबत-१. धार्मिक जातीय भाषणाबाबत-३, भेटवस्तू, कुपन वाटपाबाबत-३, दारु वाटपाबाबत-३, परवानगीशिवाय वाहनांचा वापर-१, बंदुका/ दहशत प्रदर्शनबाबत-३, मालमत्तेचे विद्रुपीकरण-१, इतर तक्रारी -३८ व सर्वाधिक तक्रारी प्राप्त आहेत त्या परवानगीशिवाय बॅनर/पोस्टर लावल्याबाबत-१०६. अशा एकूण १६३ तक्रारी प्राप्त झाल्या.
त्यातील १४३ तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले आणि ह्या तक्रारी निराकरणाचा सरासरी कालावधी ४५ मिनीटे ५५सेकंद होता. १०० मिनिटांत तक्रारींचे निराकरण होणे आवश्यक असते. ह्या तक्रारींचे विधानसभा मतदारसंघनिहाय वर्गीकरण केल्यास ते याप्रमाणे- औरंगाबाद मध्य-२५, औरंगाबाद-३३, औरंगाबाद पश्चिम ३५, गंगापूर-११, कन्नड-६, पैठण-१६, फुलंब्री २९, सिल्लोड-४, वैजापूर-४ याप्रमाणे नागरिकांनी सी- व्हिजील या ॲपवर तक्रारी केल्या आहेत.
निवडणूक आदर्श आचारसंहिता भंगाच्या दृष्टीने जिल्हा निवडणूक यंत्रणेने स्थिर निरीक्षण पथके, फिरते निरीक्षण पथके, व्हिडीओ पथके, व्हिडीओ दर्शक पथकेही स्थापन केली आहेत. तसेच नागरिकांना आपल्या सभोवताली घडत असलेल्या गैरप्रकारांबाबत तक्रार करावयाची असल्यास त्यासाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक आहे. तसेच ०२४०-२९९१८५८ हा स्वतंत्र दुरध्वनी क्रमांकही देण्यात आला आहे. तसेच mccaurangabad2024@gmail.com हा इ-मेल पत्ताही आहे. तसेच cvigil.eci.gov.in या वेबसाईटवरही तक्रार करता येते. शिवाय C-VIGIL हे ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करुनही आचारसंहिता भंगासंदर्भात तक्रार करता येते. नागरिकांनी या सर्व सुविधांचा वापर करुन निवडणूका निर्भय निष्पक्ष होण्यात योगदान द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.