पो.डा. वार्ताहर , बुलढाणा : लोकसभा निवडणुकीसाठी दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी बुलडाणा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे. या परिसराची पाहणी निवडणूक सामान्य निरीक्षक पी. जे. भागदेव यांनी केली.
यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोनेवार, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार आदी उपस्थित होते.
निवडणूक निरीक्षक श्री. भागदेव यांनी मतदानानंतर मतदान यंत्रासह आदी साहित्य ठेवण्यात येणाऱ्या स्ट्राँग रूमची पाहणी केली. मतदानानंतर याठिकाणी रात्री उशिरा मतदान यंत्रासह इतर साहित्य येणार आहे. त्यामुळे पुरेशी प्रकाशाची सोय करण्यात यावी. तसेच संपूर्ण साहित्य ठेवण्यात आल्यानंतर प्रत्येक खोली सिल करण्यात यावी. सुरक्षेसाठी सर्व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा कार्यान्वित करण्यात आले आहे. याचे नियंत्रण योग्य पद्धतीने करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये. मतमोजणीवेळी व्हीव्हीपॅट मशिनवरील मतमोजणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी. तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींना सुकर प्रवेश देण्यात यावा. मतमोजणीसाठी विधानसभा संघनिहाय व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी उमेदवार, तसेच निवडणुकीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांसाठी बैठक व्यवस्था करण्यात यावी. मतदान यंत्र स्ट्राँग रूममधून आणणे आणि परत नेण्यासाठी वेगळी मार्गीका तयार करावी. तसेच मतपत्रिका, सर्व्हीस वोटरची मतमोजणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना श्री. भागदेव यांनी केल्या.