पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृद्धी भीष्म यांच्या मार्गदर्शनात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर व तालुका विधी सेवा समिती, गोंडपिपरी यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार, दि. 28 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता दलित मित्र वि.तु.नागापुरे डी.एड कॉलेज, गोंडपिपरी येथे विधी सेवा महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या महाशिबिरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत विधी सल्ला व सहाय्य दिल्या जाणार असून सर्व शासकीय आणि निमशासकीय योजनांचे लाभ व त्यांची माहिती देण्यात येणार आहे.
महाशिबिराचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृद्धी एस. भीष्म यांच्या हस्ते होणार असून जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
तरी, सर्वांनी महाशिबिरास भेट देवून विविध योजनांची माहिती व लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी केले आहे.