पो.डा. वार्ताहर, नागपूर : महाराष्ट्र राज्याचे सर्वसमावेशी नेतृत्व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल विखारी वक्तव्य करून मनोज जरांगे पाटील यांनी शेवटी त्यांची जात दाखवली, अशी टिका भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा आणि परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राचे राजकारण दूषित करणारे हे वक्तव्य आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला लाभलेल्या समृद्ध, शालीन परंपरेला कलुषित करण्याचे काम मनोज जरांगे यांनी केले आहे, असा घणाघात देखील ऍड. मेश्राम यांनी केला.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय, मराठा समाजाच्या उन्नतीसाठी, सक्षमीकरणासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केलेले कार्य एकदा जरांगे पाटलांनी अभ्यासण्याची गरज आहे. जातीचा उल्लेख करून आणि केवळ विखारी वक्तव्य करून प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी जरांगे पाटील यांची धडपड अवघ्या महाराष्ट्राला दिसून येत आहे. संपूर्ण मराठा समाजासह महाराष्ट्राच्या जनतेची देखील दिशाभूल करण्याचे काम मनोज जरांगे करीत आहेत. मात्र ते हे सर्व कुणाच्या सांगण्यावरून करत आहेत हे तपासण्याची वेळ आलेली आहे. मनोज जरांगेंचा बोलावता धनी ज्या दिवशी पुढे येईल त्या दिवशी त्यांचा देखील बुरखा ही महाराष्ट्राची जनता फाडल्याशिवाय राहणार नाही, असेही ऍड. धर्मपाल मेश्राम म्हणाले.