नागपूर दि. १७ : भारत निवडणूक आयोगांकडून आज निवडणुकीच्या सुधारणांसंदर्भात जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातून नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांना ‘बेस्ट इलेक्ट्रॉल प्रॅक्टिस अवार्ड 2023 ‘ घोषित करण्यात आला आहे.
निवडणुकांमध्ये मतदार संख्या वाढविण्यासाठी डॉ. विपिन इटनकर यांनी ‘मिशन युवा ‘ अभियान राबविले होते. या अभियाना अंतर्गत त्यांनी 15 जुलै 2023 ते जानेवारी 2024 या काळामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला लक्षात घेऊन 75 हजार युवा मतदाराची नोंदणी करण्याचे अभियान जिल्ह्यामध्ये सुरु करण्यात आले होते.
यात जानेवारी २०२४ अखेर १७ ते १९ वयोगटातील ८८६०९ नव युवा मतदारांची नोंदणी करण्यात आली असून अद्याप ही मतदार नोंदणी सुरू आहे. या अभियानाची नोंद भारत निवडणूक आयोगाने घेतली आहे. स्वतः उद्दिष्ट ठरवून ते पूर्ण केल्याचे विशेष कौतुक आयोगाने केले आहे.
देशभरातून निवडणूक सुधारणा करणाऱ्या ७ आयएएस -आयपीएस अधिकाऱ्यांना गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी म्हणून नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचा या पुरस्कारामध्ये समावेश आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक सुधारणांसाठी एकूण ७ अधिकाऱ्यांना पुरस्कृत केले असून ४ विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. निवडणूक खर्चाच्या संदर्भातील उत्कृष्ट कामाच्या संदर्भात कर्नाटकच्या श्रीमती सीखा या आयएएस अधिकाऱ्यांना पुरस्कार मिळाला आहे. तर उत्कृष्ट कार्य करणारे निवडणूक राज्य म्हणून छत्तीसगड राज्याचा सन्मान करण्यात आला आहे.