जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत विविध स्पर्धा व उपक्रमाचे आयोजन
पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक स्पर्धेत दिवंगत खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी 1952 मध्ये कुस्ती क्रीडा प्रकारात पहिले कांस्यपदक पटकावून देशाच्या क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी राज्याचा बहुमान व नवोदित खेळाडूंना दर्जेदार कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.
चंद्रपूर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत कुस्ती, आष्टे डु आखाडा, व्हॉलीबॉल, रस्साखेच, मैदानी, लंगडी, लगोरी, सिलंबम, मॅरेथॉन क्रीडा स्पर्धा, चित्रकला व निबंध स्पर्धा आदी उपक्रमाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर व तालुका क्रीडा संकुल, बल्लारपूर येथे करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन बल्लारपूरच्या तहसीलदार कांचन जगताप यांच्या हस्ते तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर येथे करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे, मनोज पंधराम, क्रीडा मार्गदर्शक संदीप उईके, तालुका क्रीडा संयोजक किशोर मोहुर्ले आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध शाळेतील 350 खेळाडूंनी सहभाग नोंदविला असून सर्व खेळाडूंना प्राविण्य प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.