१० कोटी ५० लाख ६६ हजार रुपयांच्या जिल्ह्यातील ३ कामांचा समावेश
पो.डा. वार्ताहर , रत्नागिरी : प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत मंजुरी दिलेल्या कामांवरील स्थगिती उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरसकट उठविण्यात आली आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव संतोष रोकडे यांनी याबाबत आज शासन परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील मौजे निरुळ येथील परिसर विकसित करणे रु. ४ कोटी ६९ हजार, मौजे नाखरे (पावस) येथील परिसर विकसित करणे, रु. १ कोटी ४९ लाख ९७ हजार तसेच संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे जमीन विकत घेऊन छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक व संग्रहालय विकसित करणे रु. ५ कोटी अशा एकूण १० कोटी ५० लाख ६६ हजार रुपयांच्या ३ कामांचा समावेश आहे.
या परिपत्रकात म्हटले आहे, मुख्य सचिवांच्या १८ जुलै २०२२ व २१ जुलै २०२२ च्या टिप्पणीद्वारे १ एप्रिल २०२१ नंतर मंजूर करण्यात आलेल्या व निविदा न काढलेल्या, निविदा मागविण्यात आलेल्या आहेत. मात्र, कार्यादेश न दिलेल्या व कार्यादेश देऊनही कामे सुरु झाली नाहीत, अशा कामांना सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने स्थगिती देण्याच्या सूचना सर्व प्रशासकीय विभागांना देण्यात आल्या होत्या. तसेच, प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत दिलेल्या कामांना पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आली होती.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशा कामांची स्थगिती सरसकट उठविण्यात येत आहे. तसेच, ही स्थगिती उठविताना कोणत्याही प्रकारची अनियमितता होणार नाही,यांची दक्षता घेण्यात यावी, असे म्हटले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ही तीन विकास कामे मार्गी लागणार आहेत.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२४०११२१५३७२३३७२३ असा आहे.