18 जानेवारीपर्यंत अर्ज मागविले
पो.डा. वार्ताहर , वाशिम – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. राज्यातील विविध संस्कृतीचे आदान-प्रदान,स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ,लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी 27 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, वाशिम येथे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन शासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
या महोत्सवाअंतर्गत सांस्कृतिक रंगमंचावरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे कार्यक्रम,शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, लोककलेतील विविध प्रकार पोवाडा, भारुड,गोंधळ गीते,विविध भागातील तसेच स्थानिक दुर्मिळ आणि लुप्त होत चाललेल्या लोककला व संस्कृतीचे कार्यक्रम,राज्यातील विविध महोत्सव, कविता कार्यक्रम/व्याख्याने,देशभक्ती गीतांचा कार्यक्रम आणि जिल्ह्यातील स्थानिक सण उत्सवाची कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
यावेळी प्रदर्शन दालने देखील उभारण्यात येणार आहे.यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सचित्र दालन, राज्य संरक्षित स्मारके व गडकिल्ल्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यक्रम/प्रदर्शन, हस्तकला वस्तू दालन, बचत गटांचे उत्पादन दालन व पर्यटनविषयक दालने उभारण्यात येणार आहे.यासह राज्याची संस्कृती दर्शविणाऱ्या स्पर्धा,मर्दानी खेळ, शिवकालीन लोककला,लुप्त होत चाललेल्या खेळासंबंधीचा उपक्रम आणि जिल्हा समितीने ठरविलेले उपक्रम राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोककलावंत,महिला बचतगट, शालेय व महाविद्यालय विद्यार्थी-विद्यार्थिनी व नागरिकांनी या महासंस्कृती महोत्सवामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
या महासंस्कृती महोत्सवात सहभागी होण्यास इच्छुक असणाऱ्यांनी आपले अर्ज 18 जानेवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष येथे सादर करावे. प्राप्त अर्जाची छाननी करून काही कलाकारांना या कार्यक्रमात आपली कला दाखवण्याची संधी देण्यात येईल.असे उपजिल्हाधिकारी (रोहयो) कैलास देवरे यांनी कळविले आहे.