ठाणे महानगर पालिकेच्या वतीने दिवा शहरात राबविण्यात येत असलेल्या सुमारे ६१० कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. दिवा येथे आयोजित कार्यक्रमास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर उपस्थित होते.
दिवा शहरातील धर्मवीर नगर येथे नवीन मुख्य जलवाहिनी लोकार्पण, दिवा आगासन रस्ता येथील आरोग्य केंद्र, दातिवली गावातील व्यायाम शाळा, खुला रंगमंच, साबे गावातील शाळा, देसाई खाडी पुल आदी कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
#दिवा शहरातील अनधिकृत इमारतींचा शिक्का पुसण्यात येईल. तसेच सुनियोजित शहर म्हणून विकसित करण्यासाठी ठाण्याप्रमाणेच दिवा शहरातही समूह विकास योजना (क्लस्टर) राबविण्यात येईल, अशी घोषणा करून यासाठीची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज महापालिका आयुक्तांना दिले. दिवामध्ये स्वतंत्र पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी ५ कोटींचा निधी देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
दिवा शहराच्या विकासाचा शब्द दिला होता, मोठ्या प्रमाणात निधी देऊन तो शब्द पाळत आहे. यापुढील काळातही दिवा शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल असे सांग़ून आतापर्यंत या शहरात पाणीपुरवठ्यासाठी २४० कोटी, दिव्यातील रस्त्यांसाठी १३२ कोटी, दिवा-आगासन रस्त्यासाठी ६३ कोटी, आगरी कोळी वारकरी भवनसाठी १५ कोटी, देसाई खाडीपूलसाठी ६७ कोटी, आगासन येथे १०० खाटांच्या रुग्णालयासाठी ५८ कोटी, खिडकारी, दातिवली, देसाई तलावच्या सुशोभिकरणासाठी २२ कोटी व खिडकाळेश्वर मंदिराच्या विकासासाठी १३.५ असे एकूण ६१० कोटी रुपयांचा निधी दिला आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
दिवा रेल्वे स्थानकाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रधानमंत्री व रेल्वे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. तसेच बेतवडे येथे प्रधानमंत्री आवास योजनेतील २८०० घरांचा प्रकल्प उभा राहत आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो आवास योजनेतून १० लाख घरे बांधण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.