वाचनाने आपण घडतो, अन् समाज घडवू शकतो
-निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी
पो.डा. वार्ताहर , रत्नागिरी : वाचन ही काळाची गरज आहे. वाचाल तर वाचाल हे खऱ्या अर्थाने बरोबर आहे. वाचनाने आपण घडतो आणि समाज घडवू शकतो, असे मत निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्यावतीने सुब्रम्हनीय भारती यांचा जन्मदिवस ‘भारतीय भाषा दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, प्रा. समीर गडबडे, प्रा. डॉ. शंकर जाधव, प्रा. महेंद्र शिंदे, प्रा. प्राजक्ता कदम, को.म.सा.प. चे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, तहसीलदार हणमंत म्हेत्रे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी दीपक झोडगे आदी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी म्हणाले, पृथ्वीच्या अस्तित्वापासून अनेक सिध्दांत आहेत. त्याचबरोबर अनेक प्रश्नांची उकलदेखील झालेली नाही. आज सहजपणे मिळालेल्या गोष्टींसाठी पूर्वी खूप झगडायला लागले आहे, संघर्ष करावा लागला आहे. जनावरांनाही हक्क आहे, इथपर्यंत प्रगल्भता वाढलेली आहे. 25 वर्षापुढील जग कसे असेल यावर लिहितो, वाचतो. वाचनाने आपण घडतो आणि समाज घडवू शकतो. या सर्वांचा पाया पुस्तक आहे. वाचन संस्कृती आणि भाषा वृध्दींगत करण्याचे काम करा, असेही ते म्हणाले.
मातृभाषेतून शिक्षण प्रभावी – परिसंवादातील सूर
या निमित्ताने झालेल्या परिसंवादात कोणत्याही मातृभाषेतून घेतलेले शिक्षण प्रभावी ठरते, असे मत सर्वच विचारवंतांनी मांडले. मराठी भाषेबाबत बोलताना प्रा. कदम म्हणाल्या, वेस बदलली की भाषा बदलते. भाषेत भिन्नता असली तरी भारतीय संस्कृती एक आहे. नाटक, संगीत, साहित्य यामधून विविध भाषांची गोडी लावता येईल. भाषा शिकणं, हा उत्सव होऊ शकतो. शिक्षण जरी मातृभाषेत असले, तरी इतर भाषांचा सन्मान हा करायला हवा.
हिंदी भाषेबाबत बोलताना प्रा. शिंदे म्हणाले, हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. बोलताना गोडी निर्माण करणारी आहे. आपल्या मनातील भावना समोरच्यापर्यंत पोहचविणे, हे भाषा उत्तम काम करते. हिंदी आर्यकुलीन भाषा आहे. संतांची भाषा आहे. विश्वामध्ये एक अरबहून जादा बोलणाऱ्यांची आणि समजणाऱ्यांची ती भाषा आहे.
मराठी भाषेवर बोलताना प्रा. डॉ. जाधव म्हणाले, 56 बोलीभाषा आणि त्याच्या अनेक उपभाषा अस्तित्वात आहेत. इंग्रजीच्या आहारी जात असल्याची खंत व्यक्त करीत संस्कृती जपण्याचे काम मातृभाषाचं करते, असे ते म्हणाले.
उर्दू भाषेतून मनोगताला सुरुवात करुन प्रा. गडबडे यांनी एक वेगळेच वातावरण निर्मिती केली. ‘भाषाएँ नहीं लडती, लोग लडते है, भाषाएँ नहीं कटती, लोग कटते है, भाषाएँ नहीं मरती, लोग मरते है,’ इंद्रकुमार गुजराल यांच्या या कविताचा दाखला देत अदबशीर असलेल्या उर्दू भाषेचे महत्व सांगितले.
जिल्हा नियोजन अधिकारी श्री. मुळे आणि जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रजपूत यांनी मनोगत व्यक्त करुन कार्यक्रमाचा समारोप केला. श्री. अंकलगे यांनी कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन केले. तसेच तहसीलदार श्री. म्हेत्रे यांनी प्रास्तविक केले. यावेळी छोटेखानी ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते. कार्यक्रमाला ग्रंथपाल, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.