पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : चंद्रपूरातील पवित्र दीक्षाभूमीचा सर्वसमावेशक विकास करण्याच्या दिशेने आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. यात त्यांना यश येत असून दीक्षाभूमीच्या विकासासाठी उच्च अधिकार समितीच्या वतीने 56 कोटी 90 लक्ष रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला असुन आता सदर कामाचा प्रस्ताव अंतिम टप्यात आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी जगात नागपूर आणि चंद्रपूर अशा दोनच ठिकाणी बौद्ध धम्माची दिक्षा दिली. नागपूर येथील दीक्षाभूमीचा विकास झालेला आहे. मात्र चंद्रपूर येथील दीक्षाभूमी अविकसित राहिली आहे. येथे देशभरातुन येणाऱ्या अनुयायांसाठी कसल्याही सोयीसुविधा उपलब्ध नाही. परिणामी येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होत आहे. त्या अनुषंगाने दीक्षाभूमीच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार प्रयत्नशील आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी पहिल्याच हिवाळी अधिवेशनात
दीक्षाभूमीच्या विकासासाठी एकत्रित १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणी विधानसभेत केली होती. त्यानंतर त्यांनी दीक्षाभूमी समितीचे पदाधिकारी यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घडवून आणली होती. त्यानंतर सत्ता परिवर्तन झाल्यावर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही सदर मागणीचा पाठपूरावा सुरु ठेवला होता. अखेर त्यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूर येथील दिक्षाभुमीच्या विकासासंदर्भात घोषणा केली होती.
दरम्यान त्या अनुषंगाने चंद्रपूरच्या दिक्षाभुमी विकासासाठी उच्च अधिकार समितीच्या वतीने 56 कोटी 90 लक्ष रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून सदर प्रस्ताव वित्त व नियोजन विभागाकडे अंतिम मान्यतेकरिता पाठविला आहे. सदर प्रस्तावित निधी वित्त विभागाकडून मंजूर करत कामाला प्रशासकिय मान्यता देण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.