पो.डा. वार्ताहर , बुलडाणा : दिनांक 01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला असून, त्यानुसार जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचीही मतदार नोंदणीमध्ये मदत घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. निधी पांण्डेय यांनी आज येथे जिल्हा प्रशासनाला दिले. श्रीमती डॉ. पांण्डेय या मतदार यादी निरीक्षक म्हणून त्या बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर आल्या असता, त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, बुलढाणा जिल्ह्याचे समन्वय अधिकारी तथा अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त (भूसुधार) श्यामकांत मस्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती सुहासिनी गोणेवार, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार रुपेश खंडारे यांच्यासह माजी आमदार दिलीपकुमार सानंदा व विविध पक्षाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात विशेष शिबिरांमधून नव मतदारांची जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभाग नावनोंदणी करत आहेत. सोबतच जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची या कामी मदत घेऊन नवमतदारांची नावनोंदणी वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. ही मतदार नोंदणी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करताना मतदान केंद्रप्रमुखांनी घरोघरी जावून एकही नवमतदार नावनोंदणी करण्यापासून सुटणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश डॉ. पांण्डेय यांनी दिले.
विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी यावेळी दुबार नोंदणी झालेली नावे वगळणी करणे, बोगस मतदारांची नावे शोधणे, मृत मतदारांची नावे यादीतून कमी करणे, आठवडी बाजाराच्या दिवशी नावनोंदणी करण्यासाठी केंद्र स्थापन करणे, नगरपालिका, मोठी खेडी, घन लोकसंख्या असलेली ठिकाणे शोधून तेथील सुटलेली मतदारांची नोंदणी करून घेण्यावर भर देण्याच्या सूचना केल्या. तसेच नव मतदारांकडून फॉर्म क्रमांक 6 भरून घेत नावनोंदणी करण्यावर विशेष भर देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले