रत्नागिरी दि.01 (जिमाका):- राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विविध विकासकामांचा आढावा बैठकांचा सपाटाच लावला. सकाळी साडे अकरा ते तब्बल सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांचा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दीर्घ आढावा घेतला.
जिल्ह्यातील वाटद व पावस जिल्हा परिषद गटांच्या विकासकामांचा आढावा घेताना पालकमंत्री म्हणाले, पावसाळ्यानंतर जिल्ह्यातील सर्व विकासकामे सुरु करण्यात यावीत तसेच अपूर्ण पाणी पुरवठा योजना संबंधित यंत्रणेने लवकरात लवकर सुरु करण्याला प्राधान्य द्यावे. या जिल्हा परिषद गटातील विकासकामे करताना संबंधित यंत्रणेने, अधिकाऱ्यांनी त्या गावातील सरपंचाना कल्पना द्यावी व समन्वयातून विकासकामे पार पाडावी अशी सूचना करुन या जि.प. गटातील रस्त्याची जी कामे अपूर्ण आहेत ती डिसेंबर महिन्यापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण करावीत असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
श्री. सामंत यांनी यावेळी अपूर्ण व खराब रस्ते, प्रस्तावित नळपाणी योजना, शाळा कम्पाऊंड, दलित वस्ती सुधारणा, समाज मंदिर पेवर ब्लॉक बसविणे, अपूर्ण नळपाणी पुरवठा योजना तसेच प्रस्तावित कामे आदींबाबत संबंधित यंत्रणेकडून त्यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अमोल ओटवणेकर, गटविकास अधिकारी जे.पी. जाधव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे शाखा अभियंता सावंतदेसाई यांच्यासह संबंधित गावाचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.