चंद्रपूर, दि. 29: आर्थिक वर्ष 2023-24 करीता इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी नवीन शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना सुरू आहे. शैक्षणिक हिताच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, त्यांना शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्जावरील व्याज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यास शासनाने डिसेंबर 2021 पासून मान्यता दिली आहे.
उच्च शिक्षणासाठी राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरीता इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनींना बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रकमेवरील व्याजाचा परतावा करणे, उच्च शिक्षणासाठी बँकेकडून राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी रुपये 10 लक्ष व परदेशी अभ्यासक्रमासाठी रुपये 20 लक्ष पर्यंत कर्ज अदा करण्यात येते. यासाठी विद्यार्थ्याचे वय 17 ते 30 वर्ष असावे व तो इतर मागास प्रवर्गातील महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरिता रुपये 8 लाखापर्यंत व शासनाच्या सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या नॉन क्रिमीलेअरच्या मर्यादित असावी. अर्जदार इयत्ता बारावी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा.