पो. डा. वार्ताहर , वाशिम : – ” माझी माती माझा देश ” अभियानातंर्गत आज १७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय,नगर पालिका प्रशासन व जिल्हा परिषद वाशिमच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय ते टेम्पल गार्डन दरम्यान अमृत कलश यात्रा काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, नितीन चव्हाण,उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे,जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे, कारंजा नगर परिषदेचे मुख्याधिकारी दिपक मोरे,रिसोडचे मुख्याधिकारी सतीश शेवदा,मालेगावचे मुख्याधिकारी पंकज सोनवणे, सहाय्यक पुरवठा अधिकारी राजेश वजीरे,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांनी या मातीला नमन करून देशासाठी लढणाऱ्या वीरांना वंदन केले.हे अभियान देशासाठी आपले जीवन त्यागणाऱ्या शूरवीरांसाठी समर्पित असल्याची भावना व्यक्त केली.यावेळी मान्यवरांनी अमृत कलशामध्ये मुठभर माती व मूठभर तांदुळ गोळा केले. सर्व नगरपालिकेचे कलश या ठिकाणी गोळा करून जिल्हास्तरीय कलशामध्ये माती व मूठभर तांदूळ गोळा केले.
ही कलश यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयातून टेम्पल गार्डनपर्यंत काढण्यात आली.याप्रसंगी टेम्पल गार्डन परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.कलश यात्रेत जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी – कर्मचारी,नागरिक,नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी,नगरपरिषदेच्या शाळांचे शिक्षकवृंद व विद्यार्थी सहभागी झाले.