भागवत ज्ञान कथा कार्यक्रमात सहभाग
पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : कित्येक युगे लोटली, पण प्रत्येक युगात भागवत कथेचे, आध्यात्माचे महत्त्व कायम आहे. ईश्वराच्या साधनेने प्राप्त होणारी ऊर्जा कायम आहे. त्यामुळे तुम्हाला जर मन तंदुरुस्त ठेवायचे असेल तर अध्यात्माशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
तीर्थरुपनगर येथील राधेश्याम मंदिरात आयोजित भागवत ज्ञान कथा कार्यक्रमात ना. श्री. मुनगंटीवार सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ह.भ.प.मयूर महाराज, भाजपा महानगर अध्यक्ष राहुल पावडे, भाजयुमोचे सुनील डोंगरे, अंबादास पिंपळकर, रामचंद्र डोंगरे, प्रभाकर राऊत, एकनाथ दरवेकर, भारती बोभाटे, नीलिमा तळवेकर, चंद्रशेखर झिलपे, गोवर्धन तिवस्कर, अर्जुन सिडाम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘ज्याप्रमाणे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी भोजन आवश्यक आहे, त्याचप्रमाणे मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी अध्यात्म, भागवत कथा आवश्यक आहे. आणि आज संपूर्ण जगाने भारताचे हे वैशिष्ट्य मान्य केले आहे. ज्या देशांनी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रगती केली आहे, त्या देशांनी अध्यात्माचे महत्त्व आणि फायदे दोन्ही मान्य केले आहे. १८व्या शतकात तंत्रज्ञानाचा अभाव होता, पण आनंदाचा आणि समाधानाचा प्रभाव होता. आज उलट परिस्थिती आहे. पूर्वी आपण ‘हम साथ साथ है’ म्हणायचो आज प्रत्येक जण एकमेकांना ‘हम आपके है कौन?’ असे विचारतो.’
वारीमध्ये येते प्रचिती
पांडुरंगाच्या वारीचा प्रारंभ करण्यासाठी आळंदीला गेलो तेव्हा खरा आनंद, खरे समाधान मला बघायला मिळाले. वारीत सहभागी झालेला एखादा वारकरी आर्थिकदृष्ट्या गरीब असतो. त्याची परिस्थिती हलाखीची असते. मात्र, पांडुरंगाच्या भक्तीची ऊर्जा त्याच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित होते आणि तो सदैव प्रसन्न, आनंदी आणि समाधानी असतो. मला याची प्रचिती प्रत्यक्षात घेता आली. ईश्वराची आराधना केल्याने जी ऊर्जा प्राप्त होते, ती आणखी कशानेही प्राप्त होत नाही. त्यामुळेच पूर्वीपासून ‘जो काम दवा नहीं कर सकती वो दुवा कर देती है’, असे म्हटले जाते,’ असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.