पो.डा. वार्ताहर , वाशिम : क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे. जगात दर दोन मिनिटात क्षयरोग प्रतिबंध औषधी न घेणारे तीन क्षयरुग्ण दगावत आहे. या रोगाचा फैलाव टाळणे व प्रत्येक क्षयरुग्णास क्षयरोगमुक्त करण्यासाठी खाजगी क्षेत्रातील प्रयोगशाळा, औषध विक्रेते आणि वैद्यकीय व्यावसायीकांनी आरोग्य खात्याकडे त्यांच्याकडे निदान झालेल्या क्षयरुग्णांची माहिती देणे बंधनकारक आहे. माहिती न दिल्यास त्यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधानानुसार कडक कारवाई करण्यात येईल. असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश परभनकर यांनी कळविले आहे.
भारतीय राजपत्रानुसार १९ मार्च २०१८ च्या खाजगी वैद्यकीय व्यावसायीक, प्रयोगशाळा व खाजगी औषध विक्रेत्यांनी त्यांच्याकडे निदान झालेल्या प्रत्येक क्षयरुग्णांची नोंद शासनाकडे करणे बंधनकारक आहे. परंतू काही खाजगी वैद्यकीय व्यावसायीक, प्रयोगशाळा आणि औषध विक्रेते त्यांच्याकडे निदान होणाऱ्या क्षयरुग्णांची नोंदणी करीत नसल्याचे निदर्शनास आल्याने व या रोगाची गंभीरता ओळखून जर निदान होऊनही क्षयरुग्णांची नावे जिल्हा क्षयरोग केंद्राकडे न पाठविल्यास ही बाब गंभीर समजून संबंधितांविरुद्ध कलम २७९ अन्वये सहा महिन्याचा कारावास अथवा दंड किंवा दोन्ही शिक्षा तसेच कलम २७० अन्वये जाणून बुजून द्वेषपूर्ण घातक कृत्यामुळे जीवितास हानी पोहोचवित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. रोगाचा फैलाव होण्याची शक्यता असल्याने जास्तीत जास्त दोन वर्षांपर्यंत कारावास अथवा दंड अशी शिक्षा करण्याची तरतूद आहे.
अशाप्रकारची कारवाई जिल्ह्यात कुणावर होऊ नये यासाठी खाजगी प्रयोगशाळेत निदान घेणाऱ्या क्षयरुग्णांची माहिती प्रपत्र १, खाजगी वैद्यकीय व्यावसायीकांनी क्षय रुग्णाची नोंद माहिती प्रपत्र २ व खाजगी औषध विक्रेते यांनी त्यांच्याकडील क्षयरुग्णांची व औषधीची माहिती प्रपत्र ३ मध्ये कळवावी. स्वतःवर होणारी अप्रिय कारवाई टाळावी. वरील तीनही स्वरूपाचे प्रपत्र जिल्हा क्षयरोग केंद्र वाशिम, प्रत्येक तालुकास्तरावरील ग्रामीण रुग्णालय आणि तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे उपलब्ध आहे. संबंधितांनी येथे संपर्क करून क्षयरुग्णांची माहिती किमान दरमहा कळवावी किंवा dtomhwsm@rntcp.org या मेल आयडीवर पाठविण्यात यावी. असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
दोन आठवडयापेक्षा जास्ता खोकला संध्याकाळी वाढणारा ताप व घाम येणे, भूक मंदावणे, वजनात लक्षणीय घट होणे, छातीत दुखणे, थुंकीतून रक्त पडणे आणि मानेवर गाठी येणे ही क्षयरोगाची लक्षणे आहेत.
खाजगी क्षेत्रातील प्रयोगशाळा, औषध विक्रेते आणि वैद्यकीय व्यावसायीकांसाठी शासकीय नविन योजना- नविन क्षयरुग्ण कळवून संदर्भात केल्यास संबधीत व्यक्तीच्या बँक खात्यात ५०० रुपये जमा केले जातात. खाजगी डॉक्टरांसाठी क्षयरुग्णाचे निदान करुन क्षयरोग केंद्रात रुग्णाची नोंद केल्यास ५०० रुपये व उपचार पुर्ण झाल्याची नोंद केल्यास पुनःश्च ५०० रुपये देण्यात येते. उपचार सहाय्यकास क्षयरुग्णांचा उपचार पूर्ण केल्यास १ हजार रुपये देण्यात येते. प्रत्येक क्षयरुग्णाला उपचार पुर्ण होईपर्यंत प्रतिमहा ५०० रुपये इतके अनुदान पोषक आहाराकरीता रुग्णाच्या बँक खात्यात जमा केले जाते. क्षयरोगाचे सर्व निदान व उपचार शासकीय केंद्रात मोफत केले जातात. असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतिष परभनकर यांनी कळविले आहे.