पो. डा. जिल्हा प्रतिनिधी , जितेंद्र मशारकर चंद्रपूर :
कुठे मदत मिळाली नाही,तर कुठे सर्व्हेच झाले नाही
वडगाव प्रभाग तसेच चंद्रपूर शहरातील अनेक पूरपीडित नागरिक मदतीपासून वंचित आहेत.पूरग्रस्त भागातील काही नागरिकांचा सर्व्हे झाला पण मदत मिळाली नाही व काही भागांमध्ये सर्व्हेच झालेला नसल्याने अनेक पूरपीडितांना अजूनपावेतो शासनाची मदत मिळालेली नाही. सर्व पूरपिडित नागरिकांना तातडीने मदत देण्यात यावी व ज्या पूरग्रस्त नागरिकांचा सर्वे झालेला नाही त्यांचा तातडीने सर्वे करण्यात यावा अशी मागणी जनविकास सेने तर्फे करण्यात आलेली आहे. जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष मनपाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांचे नेतृत्वात एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विनय गौडा यांना दिनांक 17 ऑगस्ट रोजी निवेदन देऊन मदतीपासून वंचित असलेल्या पूरपिडित नागरिकांची व्यथा मांडली. यावेळी जनविकास सेना महिला आघाडी प्रमुख मनिषा बोबडे, युवा आघाडीचे अध्यक्ष अक्षय येरगुडे,इमदाद शेख, प्रफुल बैरम,आकाश लोडे, कांचन चिंचेकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
वडगाव प्रभागातील दत्तनगर नगर, नानाजी नगर,ओम भवन, चांद टेकडी,मित्र नगर, अपेक्षा नगर , साई मंदिर,आंबेडकर भवन,स्नेह नगर,बापट नगर ,विकास केंद्र, गजानन मंदिर,हवेली गार्डन,लक्ष्मी नगर,वडगाव जुनी वस्ती इत्यादी परिसरातील शेकडो घरांमध्ये 19 जुलै व 28 जुलै असे दोन दिवस अचानक आलेल्या पावसाने पुराचे पाणी शिरले. चंद्रपूर शहरातील नगीनाबाग प्रभाग, पठाणपुरा,जलनगर, अष्टभुजा अशा अनेक परिसरामध्ये 19 जुलै रोजी पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे हजारो नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. वडगाव प्रभाग तसेच चंद्रपूर शहरातील अशा सर्व पूरपीडित नागरिकांना आर्थिक मदत देण्याची मागणी जनविकास सेनेने केलेली आहे.
ब्लाॅक
पालकमंत्र्यांनी पुन्हा एकदा क्विक अॅक्शन घ्यावी..
जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी क्विक अॅक्शन घेऊन पूरपीडित नागरिकांना
शासनाची आर्थिक मदत मिळवून दिल्याचा दावा भाजपच्या स्थानिक शाखेने केला होता.पालकमंत्र्यांनी क्विक अॅक्शन घेऊनही हजारो पुरग्रस्त मदतीपासून वंचित आहेत. त्यांच्या क्विक अॅक्शनचा प्रशासनावर परिणाम झालेला नसल्याचे दिसत आहे.त्यामुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा क्विक ॲक्शन घेऊन मदतीपासून वंचित शहरातील हजारो पुरग्रस्तांना मदत मिळून द्यावी असे आवाहन पप्पू देशमुख यांनी केलेले आहे.