पो.डा. वार्ताहर, परभणी : प्रशासन लोकभिमुख करणे, त्यात निर्णयक्षमता आणणे आणि सर्वाच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यन्वीत करणे यासाठी ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ सन २०२३-२४ साठी जिल्ह्यात सर्व स्तरावर २० ऑगस्टपासून राबवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले.
सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ आणि लोकभिमुखता या दोन मुख्य बाबींच्या आधारे अभियानाचे कार्यक्षेत्र व कार्यपद्धती नव्याने निश्चित करायची आहे. त्यामुळे शासन निर्णयान्वये ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ या अभियानाचा कृती कालावधी प्रतिवर्षी दिनांक २० ऑगस्ट ते २ ऑक्टोबर असा दीड महिन्याचा राहणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले. यासाठी ३ फेब्रुवारी २०२१ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा यासाठी खास विकसित केलेल्या पोर्टलवर (pragatiabhiyan.maharashtra.gov.in) ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
या अभियानाच्या स्पर्धेसाठी सर्व स्तरावर १६ ते ३१ ऑक्टोबर २०२४ ही अर्ज स्वीकारण्याची मुदत असून, त्याबाबतचे मुल्यमापन वेळापत्रकही कळविण्यात आले आहे. स्पर्धेसाठीचा २० ऑगस्टपासून एक वर्षाचा कालावधी असेल. उपविभागाचे मुख्यालय असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी आणि इतर तालुक्यात तहसीलदार हे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरंपच, ग्रामसेवक, तलाठी व गटविकास अधिकारी यांना निमंत्रीत करतील व तालुका स्तरावरील अधिका-यांच्या सभेमध्ये प्रगती अभियानाची संकल्पना मांडणार आहेत. याच सभेमध्ये सहभागी होण्यासाठी विधान सभा सदस्य, विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व सभापती, पंचायत समिती यांना विशेष विनंती करण्यात येणार आहे.
या कालावधीमध्ये राबविण्यात येणारे कार्यक्रम (महसूल अभियान, पंचायतराज, इंद्रधनुष्य अभियान) समांतरपणे चालू राहणार आहेत. त्यामध्ये करण्यात येणा-या कामगिरीचा समावेश अभियानाच्या कार्यक्षेत्रांमध्ये करता येईल. या योजनेत जास्तीत-जास्त सहभाग घ्यायचा आहे. त्यामुळे सर्व विभाग प्रमुखांनी स्पर्धेचे अर्ज याच परिपत्रकामध्ये नमूद केल्यानुसार विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने तात्काळ पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी केल्या आहेत.