जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला उपक्रमाच्या तयारीचा आढावा
पो. डा. वार्ताहर , परभणी : केंद्र शासनाकडून ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील ग्रामीण भागात हा उपक्रम व्यापक स्वरुपात राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी आज या उपक्रमाचा जिल्हास्तरीय आढावा घेतला.
आमदार श्रीमती मेघना बोर्डीकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तु शेवाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ. संदीप घोन्सीकर, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, शैलेश लाहोटी, तहसीलदार श्रीराम बेंडे, आर. एन. पवळे, मनपा उपायुक्त जयवंत सोनवणे, प्रदिप जगताप, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक शशांक राऊला यावेळी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत ९ ते १४ ऑगस्ट दरम्यान ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ हा उपक्रम संपूर्ण देशात राबविण्यात येत असून, जिल्ह्यात महानगरपालिका, शहरी भागात तसेच ग्रामीण भागात जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हा उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग वाढविण्याच्या सूचना आमदार मेघना बोर्डीकर यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.
जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींपैकी ६४२ ठिकाणी शिलालेख लावण्याचे काम सुरू असून, ७०४ ग्रामपंचायतींमध्ये अमृत वाटीकाच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. २ लाख ६३ हजार ४३९ राष्ट्रध्वज जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असल्याचे डॉ. घोन्सीकर यांनी सांगितले. उपक्रमांतर्गत अमृत सरोवर येथे शिलालेख लावण्यात येत आहेत. त्यावर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा लोगो, प्रधानमंत्री यांचा व्हीजन २०४७ संदेश, शहीद विरांची नावे या शिलालेखावर कोरून ती ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात लावण्याचे काम सुरु असल्याचे डॉ. घोन्सीकर यांनी सांगितले. तसेच पंचप्रण प्रतिज्ञा घेण्यात येणार असून, येथे सेल्फी काढणे, वसुंधरा वंदन करताना गावातील योग्य ठिकाण निवडून वसुधा वंदन म्हणून ७५ देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करून अमृत वाटीका करण्यात येणार आहे. या उपक्रमांमध्ये स्वातंत्र्यसैनिक, वीरांना वंदन करणे, ध्वजारोहण व राष्ट्रगान गायन आदींचा या उपक्रमात समावेश असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदिप घोन्सीकर यांनी सादरीकरणाद्वारे दिली.
अमृत सरोवराच्या ठिकाणी, शालेय परिसरात किंवा ग्राम पंचायत परिसरात लावण्यात येणार असून, ध्वजारोहण आणि राष्ट्रगान आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमासाठी ग्रामीण भागातून २-३ मूठ माती जिल्हास्तरावर अमृत कलशांच्या माध्यमातून आणली जाणार आहे. ही माती जिल्ह्यातील नेहरू युवा केंद्राच्या वतीने ९ तालुक्यातील आणि महानगरपालिकेचा १ असे एकूण १० अमृत कलश युवक दिल्लीकडे विशेष रेल्वे बोगीने जाणार आहेत.
जिल्ह्याच्या विविध भागात सेल्फी पाँईट उभारून पंचप्राण प्रतिज्ञा घेताना नागरिकांना आपल्या हातात मातीचा दिवा घेऊन प्रतिज्ञा घ्यायची आहे. शाळा, महाविद्यालये विविध ठिकाणी सेल्फी पॉइंट उभारण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.