पो. डा. वार्ताहर : मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ रेल्वे स्थानकांच्या रस्ते काँक्रिटीकरण व सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
कोकणातील पर्यटनाला चालना देण्याकरिता रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे स्थानकांच्या पोहोच मार्गाची देखभाल दुरुस्ती व परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे त्यासाठी कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला होता. या करारानुसार प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या महत्त्वाच्या १२ रेल्वे स्थानकांचे काम पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात आले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात या स्थानकांवरील कामांकरिता ५६.२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून या कामांचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
‘या’ १२ रेल्वे स्थानकांचे होणार सुशोभिकरण :
✅रायगड जिल्हा- वीर, माणगाव आणि कोलाड
✅रत्नागिरी जिल्हा – चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर आणि खेड
✅सिंधुदुर्ग जिल्हा – कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ आणि सावंतवाडी
मंत्रालयात आयोजित या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे तर दूरदृश्यप्रणालीद्वारे केंद्रीयमंत्री नारायण राणे, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते.