पो.डा. वार्ताहर,परभणी : नागरिकांच्या अडीअडचणी सोडविसाठी जिल्हा महसूल आणि प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असतेच. त्यात काही प्रकरणे विविध विभागांमध्ये अडकलेली असतात. त्या प्रलंबित प्रकरणांना निपटारा करण्यासाठी आता महसूल सप्ताहासारखे त्रैमासिक विशेष उपक्रम जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्याचा प्रयत्न करूयात, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज उपस्थित अधिकाऱ्यांना केले.
जिल्हा नियोजन भवन येथे आज महसूल सप्ताहाची यशस्वी सांगता झाली. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. गावडे बोलत होते. अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तु शेवाळे, उपविभागीय शैलेश लाहोटी, जीवराज डापकर, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर, तहसीलदार सुरेश घोळवे, श्रीराम बेंडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
केंद्र शासनाकडून देशपातळीवर ‘मेरी मिट्टी मेरा देश’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे या उपक्रमांतर्गंत केंद्र तसेच राज्य शासनाचे विविध फ्लँगशिप कार्यक्रम राबवायचे आहेत. या उपक्रमांतर्गंत विभागप्रमुखांनी कोणतीही प्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत, असे सांगून लोकांसाठी जिल्हा प्रशासन आहे, ही भावना लक्षात ठेवून यापुढे लोकहिताची कर्तव्ये पाडूया, असे आवाहन त्यांनी केले.
सेलू येथील महसूल दिंडीने महसूल दिनाचा सुरुवात झाली. या कार्यक्रमात विविध शासकीय योजनांच्या साडेतीन हजार कागदपत्रांचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. सप्ताहात जवळपास सहा हजारावर प्रकरणे निकाली निघालीत. यामध्ये ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, महसूलातील सेवानिवृत कर्मचा-यांनाही त्यांचे लाभ प्रदान करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने या सप्ताहात उत्तम समन्वय ठेवून चांगली कामगिरी पार पाडली. त्यामुळे यापुढे वर्षभर असेच चांगले कार्यक्रम राबविले जावू शकतात, हा विश्वास यंत्रणेने दाखवून दिला. असून, यापुढे महसूल सप्ताहासारखे त्रैमासिक विशेष उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करूया, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना केले.
जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या महसूल सप्ताहातून युवा संवाद, एक हात मदतीचा आदी अनेक कार्यक्रम राबविले. राष्ट्रीय कुटूंब योजनेचा लाभ देताना, सामाजिक भान जपत काही ठिकाणी कुटुंबांचे समुपदेशन केले. या सप्ताहामध्ये जनसंवाद, ई-फेरफार, रस्ता अदालत, ई-पीक पेराबाबतची माहिती, ई-मोजणीची माहिती दिली. समाजामध्ये सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करून वीर माता, वीरपत्नी, विधवा, वीर पिता यांना मदत करण्यात आली. तसेच या कार्यकर्मातून देशसेवेसाठी बलिदान देणा-यांच्या नातेवाईकांचा गौरव करण्यात आला. सात वर्षांपासून प्रलंबित सैनिकाच्या सातबाराचे प्रकरण निकाली काढण्यात आल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी प्रास्ताविकातून दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार लक्ष्मीकांत खळीकर यांनी केले तर आभार तहसीलदार सुरेश घोळवे यांनी आभार मानले.