पो.डा. वार्ताहर , बुलढाणा : जिल्ह्याला अनुसूचित जाती उपयोजनेतून निधी प्राप्त होतो. या निधीतून नागरिकांना उपयुक्त आणि दर्जेदार कामे निर्माण व्हावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले.
सन 2023-24 या वर्षातील अनुसूचित जाती उपयोजनेतून करण्यात येणाऱ्या कामांची माहिती जिल्हाधिकारी यांनी घेतली. यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड म्हणाले, अनुसूचित जाती उपयोजनेतून नियतव्यय प्राप्त झाला आहे. त्यानुसार विभागांनी आपली मागणी नोंदवावी. उपयोजनेतून कामे करताना त्यातून संपत्ती निर्माण होईल, अशी कामे करण्यात यावीत. गेल्या वर्षी करण्यात आलेल्या कामांची गुणवत्ता तपासण्यात यावी. तसेच कामांबाबतचे रेकॉर्ड करून चांगल्या कामांची पुस्तिका तयार करावी.
जिल्हा नियोजनमध्ये यावर्षीपासून जिल्ह्याची बलस्थाने शोधून कामे करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती उपयोजनेतून विकासाची कामे करण्यात यावीत. गेल्या कालावधीत पूरामुळे पाच तालुक्यातील रस्ते, शाळा इमारतींचे नुकसान झाले आहे. जिल्हा नियोजन आणि अनुसूचित जाती उपयोजनेतून निधी उपलब्ध असल्याने ही कामे तातडीने करता येणे शक्य आहे. यादृष्टिकोनातून प्रत्येक विभागांनी आपले प्रस्ताव सादर करावेत. अनुसूचित जाती उपयोजनेतून नाविन्यपूर्ण योजनेसाठी निधी राखीव ठेवण्यात आला आहे. यासाठी विभागांनी प्रस्ताव सादर करावेत. आलेल्या प्रस्तावाची छाननी करून अंतिम करावेत, त्यांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून द्यावा, अशा करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.