मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांचे सांत्वन
पो.डा. वार्ताहर , बुलढाणा : मलकापूर येथील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या दोन ट्रॅव्हल्सच्या अपघातातील जखमींची विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.
अमरनाथ यात्रेवरून येणारी बस आणि नागपूर-नाशिक खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचा शनिवार, दि. 29 जुलै रोजी पहाटे तीन वाजता अपघात झाला. यात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती प्राप्त होताच विभागीय आयुक्त डॉ. निधी पांण्डेय यांनी जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्या समवेत घटनास्थळाला भेट दिली. अपघातानंतर गुरूद्वारा येथे थांबविण्यात आलेल्या प्रवाशांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अपघातात मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगितले. प्रवाशांना त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था केली. तसेच रस्त्यांमधील प्रशासकीय अधिकारी यांचे संपर्क क्रमांक दिले. प्रवासात मदत लागल्यास या क्रमांकावर संपर्क करण्यास सांगितले.
डॉ. पाण्डेय यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात अपघातातील जखमींची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी जखमींची आस्थेने चौकशी करून लवकर बरे होण्याच्या सदिच्छा दिल्या. तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.