पोलीस डायरी अहमदनगर, संतोष नाईक, जिल्हा प्रतिनिधी : अहमदनगर जिल्हातील शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात सुरुवातीला पेरणी योग्य पाऊस झाला नसताना ही पेरणीचा मोसम वाया जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी धाडसाने पेरणी केलेल्या खरीप पिकास चांगल्या पावसाची आवश्यकता असल्याने थेम्ब थेम्ब पावसाने पिके बऱ्यापैकी उगवून येऊन ताशी लागली आहेत.
त्यामुळे पिकातील अंतर्गत मशागती शेतकरी बांधवांनी सुरू केल्या आहे. तालुक्याच्या पूर्व भागात चापडगाव, बोधेगाव, हातगाव, बालमटाकळी, मुंगी, कांबी, लाजळगावसह इतरही गावात जमिनीचे मोठे क्षेत्र असून, या क्षेत्रात शेतकऱ्यांनी नगदी पीक व शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कपाशी पिकाकडे मोठा कल आहे. तालुक्याच्या पूर्व भागात व संपूर्ण तालुक्यातच कपाशी पिकाचा भरमसाठ पेरा व लागवड झाली असल्याने आता पेरणी केलेल्या पिकाचे रक्षण करून, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ साठीची लगबग शेतकऱ्यांत सुरु
आहे .
जिल्ह्यात शेवगाव तालुक्यातून प्रत्येक वर्षी कापसाचे पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असते. या पिकासाठी लागणारी खते व औषधे वेळेवर मिळत नसल्याचा अनुभव दर वर्षी येत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी महागाची खते व औषधे आधीच खरेदी करून ठेवले आहेत.
सध्या तालुका परिसरात दमदार पावसाची गरज आहे, पण साधारण पडत असलेल्या पावसावरच पिके वाढताना दिसून येत आहेत. तालुक्यात अजून पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला नसला तरी बहुतेक ठिकाणच्या विहिरी व तळ्यांतील पाणी आटत असल्याने येणाऱ्या मोठ्या पावसाकडेच शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. पावसाचे २ महिने उलटत असताना, इतरत्र अतिवृष्टीने कहर केला असताना या तालुक्यात दमदार पाऊस होत नसल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे.