पो.डा. वार्ताहर , ठाणे :
ठाणे येथे धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल व त्रिमंदीर संकुलाचे भूमिपूजन आज करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत व दादा भगवान फाऊंडेशनचे दीपकभाई देसाई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टाटा मेमोरियल सेंटर, ठाणे महानगरपालिका आणि ‘जितो’ ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नातून बाळकूम रोड (ग्लोबल हॉस्पिटल) येथे हे कॅन्सर सेंटर साकारण्यात येणार आहे.
आज माझ्या गुरुचे नाव या हॉस्पिटलला दिले आहे. धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल हे केवळ ठाणे जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी देखील महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. या हॉस्पिटलच्या नावातच आनंद आहे. ज्यांनी आयुष्यामध्ये फक्त इतरांच्या आनंदाचाच विचार केला, दुसऱ्याचा आनंद हाच आपला आनंद मानला. दुसऱ्यांचे दुःख कमी करण्याचे काम केले, अशा धर्मवीर आनंद दिघेंचे नाव या कॅन्सर हॉस्पिटलला देण्यात आले आहे. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
परिवाराच्या दुःखापेक्षा समाजाचे दुःख आपले दुःख मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. या हॉस्पिटलची समाजाला नितांत आवश्यकता होती. अत्याधुनिक सुविधा या हॉस्पिटलमध्ये निर्माण केल्या जाणार आहेत. चांगला उपक्रम या ठिकाणी सुरू होईल. या हॉस्पिटलसाठी शासनाकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल. दि.३१ डिसेंबरचा दिवस आम्ही आजही रक्तदानाने साजरा करतो. ही परंपरा स्व. दिघे साहेबांनी सुरू केली होती. त्यांच्यामुळेच आम्ही घडलो. आज मी जरी मुख्यमंत्री असलो तरी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो व यापुढेही असेच काम करीत राहीन, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी दिली.
या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या आरोग्य सोयी-सुविधांसह सहाशेहून अधिक खाटांचे नियोजन करण्यात येणार असून गरजू कॅन्सरग्रस्त रुग्णांना अत्याधुनिक क्रोटॉन थेरपीचीही सुविधा तसेच रुग्णांबरोबर येणाऱ्या नातेवाईकांसाठी अत्यल्प दरात भोजन व्यवस्था देखील असणार आहे.
कार्यक्रमास केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व राहुल शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.