पो. डा. वार्ताहर , वाशिम : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गात येणाऱ्या चर्मकार समाजातील चांभार,ढोर,होलार व मोची यांच्याकरीता आर्थिक,शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी विविध कर्ज योजना राबविल्या जातात.
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरीता राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या एनएसएफडीसी योजना राबविण्यात येत आहे. ४ हजार ८०० लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
एनएसएफडीसी,नवी दिल्ली यांच्या मुदती कर्ज योजनेअंतर्गत स्मॉल बिझनेससाठी १ लक्ष ते २ लक्ष रुपयापर्यंत,चर्मोद्योगासाठी २ लक्ष रुपये आणि लघुऋण वित्त योजना व महिला समृध्दी योजनेसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये आहे. या योजनांसाठी मागील प्रलंबित नस्तीकरीता २२ कोटी २१ लक्ष रुपये निधी प्राप्त झाला आहे.
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात एनएसएफडीसीच्या मुदती कर्ज योजनेअंतर्गत स्मॉल बिझनेससाठी ५ लक्ष रुपये, लघुऋण वित्त योजना व महिला समृद्धी योजनेसाठी प्रत्येकी १ लक्ष १० हजार रुपये आणि नवीन महिला अधिकारीता योजनेसाठी ५ लक्ष रुपये मंजूर आहे. एनएसएफडीसीच्या शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये वाढ झाली आहे. देशात २० लक्ष रुपये आणि विदेशात ३० लक्ष रुपये कर्ज मंजूर करण्यात येणार आहे.तरी सर्व चर्मकार बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा.अधिक माहितीसाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास भेट द्यावी.असे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी कळविले आहे.