पो. डा. वार्ताहर , बुलडाणा : केंद्र शासनाच्या निर्णयानुसार रास्त भाव दुकानातून भारतीय पोस्ट पेमेंट बँकेच्या सुविधा मिळणार आहे. नागरिकांनी या सेवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाक विभागाने केले आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक द्वारे सर्व शिधावाटप, रास्त भाव दुकानांमधून बँकेच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शिधावाटप, रास्त भाव दुकानदारांकडे बँकांचे व्यावसायिक प्रतिनिधी नियुक्त करण्यात येणार आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ही केंद्र शासनातर्फे चालविण्यात येणारी १०० टक्के सरकारच्या मालकीची बँकिंग सेवा देणारी बँक आहे. भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयांतर्गत असलेल्या टपाल विभागातर्फे ही सेवा चालविली जाते. देशातील सर्वात सुलभ, परवडणारी आणि विश्वासार्ह बँक बनण्याच्या दृष्टीकोनातून बँकेची सुरुवात केली आहे.
बँकेतर्फे धन हस्तांतरण, थेट लाभ हस्तांतरण, देयक भरणा, आरटीजीएस आदी सुविधा देण्यात येतात. सदर बँक ही 100 टक्के कागदविरहित कामकाज असणारी बँक आहे, जी ग्राहकांना ओटीपी किंवा बायोमेट्रिक वापरून डिजिटल व्यवहाराद्वारे मोबाईल अप्लिकेशन, पोस्टमन आणि पोस्ट ऑफिसमधून व्यवहार करण्यास सक्षम करते. बँक आपल्या पोस्टमनच्या माध्यमातून ग्राहकांना घरपोच सेवा देण्यात अग्रेसर आहे. बँकांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा रास्त भाव दुकान मार्फत दिल्या जाऊ शकतात. तसेच दोन्ही विभागांसाठी परस्पर फायदेशीर ठरू शकते, त्याचबरोबर रास्त भाव दुकानदाराचे उत्पन्न सुधारेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यामुळे बँकांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचतील.
सामान्य नागरिकांसाठी, विशेषत: दुर्गम भागात बँकिंग आणि नागरिक केंद्रित सेवा मोठ्या प्रमाणात सुधारतील. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी रास्त भाव दुकानदारांमध्ये जागरूकता निर्माण करून जेथे शक्य असेल तेथे बँकांच्या सेवा प्रदान करता येतील. हा उपक्रम यशस्वी झाल्यास लाखो नागरिकांच्या जीवनमानात सुलभता येणार आहे. ही सेवा यशस्वी करावी, असे आवाहन डाक अधिक्षक गणेश आंभोरे यांनी केले आहे.