पो. डा. जिल्हा प्रतिनिधी , जितेंद्र मशारकर चंद्रपूर : मंगळवार 18 जुलै ला सकाळपासून चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली, या पावसामुळे ग्रामीण भागच नव्हे तर चंद्रपूर महानगराला झोडपून काढले.
2 दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या पावसाने अनेक मार्ग बंद झाली होती, मात्र शहरात पाऊस नसल्याने नागरिक उकाड्याने त्रस्त झाले होते, पण मंगळवारी सकाळी शहरात मुसळधार पाऊस सुरू झाला, या पावसाने शहरातील मुख्य मार्गावर 1 ते 2 फूट पाणी साचल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला.
शहरातील गिरनार चौक, जयंत टॉकीज चौक, बिनबा गेट, सरकार नगर, सिस्टर कॉलोनी, जलनगर मार्ग व काही भाग जलमय झाला.
आझाद बगीचा पुढील उंचावर असलेल्या दुकानात पाणी शिरल्याने दुकांनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना भर पावसात गुडघ्याभर पाण्यातून वाट काढत जावे लागले, वाहनधारकांना सुद्धा नाहक त्रास सहन करावा लागला.
सरकार नगर येथील काही अपार्टमेंट मध्ये नाल्याचे पाणी शिरले, चंद्रपूर – मूल मुख्य मार्ग परिसरात वाहतूक तुडुंब भरून वाहत असलेल्या नाल्यामुळे ठप्प पडली होती.
दुर्गापूर परिसरात वेकोलीच्या ओव्हर बर्डन मुळे वार्ड क्रमांक 3 मध्ये अनेक घरात पाणी शिरले होते. शहरातील भिवापूर, माता नगर भागातील नाले तुडुंब भरल्याने पाण्याला जाण्याची वाट मिळत नसल्याने नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले.
चंद्रपूर मनपाच्या ढिसाळ नियोजनामुळे चंद्रपूर शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला, पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची व्यवस्थित सफाई न झाल्याने पहिल्या पावसात मनपाच्या कामाचा फज्जा उडाला.
विशेष म्हणजे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरापुढे 1 ते दीड फूट पाणी वाहत होते.